वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 10 पदे रिक्त | पुढारी

वाल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रातील 10 पदे रिक्त

वाल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वाल्हे (ता. पुरंदर) प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नसल्याने आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. औषधपुरवठाही अपुरा होत आहे. याबाबत ग्रामस्थांच्या मागणीनुसार, माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम काळे यांच्या उपस्थितीत आरोग्य केंद्रात बैठक पार पडली.

मागील काही महिन्यांपासून बदली, सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्ती, वैद्यकीय कारणास्तव आरोग्य केंद्रातील विविध पदे रिक्त झाली आहेत. यामुळे रुग्णांना सेवा पुरविण्यात अनेक अडथळे येत आहेत. रुग्णांना सेवा देताना कर्मचारीवर्गाला तारेवरील कसरत करावी लागते. प्राथमिक आरोग्य केंद्राला तसेच उपकेंद्रांना कायमस्वरूपी कर्मचारीवर्ग द्यावा, आरोग्य केंद्राच्या इमारतीची, कर्मचारीवर्गाच्या निवासाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशा विविध मागण्यांबाबत ग्रामस्थ व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यात बैठक घेत ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. कर्मचार्‍यांची पदे केंद्रांतर्गत येणार्‍या लोकसंख्येच्या तुलनेत कमी असल्याने आरोग्यसेवेवर ताण येत आहे.

या बैठकीत, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरुस्ती, स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून घ्यावी. औषध- गोळ्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात करावा, प्रसूतिगृह दुरुस्ती आदी मागण्या करण्यात आल्या. जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. या वेळी सरपंच अमोल खवले, दौंडज सरपंच सीमा भुजबळ, डॉ. प्रशांत आंधळे, डॉ. तेजस्विनी पवार, संजीवनी दरे, तानाजी मेटकरी, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, देविदास पांडकर, अतिश जगताप, सागर भुजबळ, अक्षय खुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाल्हे आरोग्य केंद्रातील रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी – 1.
औषध निर्माण अधिकारी – 2.
जे. एन. एम – 1.
आरोग्यसेविका – 2.
कनिष्ठ सहायक – 1.
परिचर – 3.

जिल्हा परिषदेकडे रिक्त पदांचा अहवाल सादर केला आहे. रिक्त पदे भरल्यास आरोग्यसेवेचे कामकाज अधिक गतीने होईल. सध्या तरी नागरिकांना वेळवर व चांगली आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न आहे. लवकरच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन यासंदर्भात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

                                                   डॉ. विक्रम काळे,
                                              तालुका वैद्यकीय अधिकारी.

Back to top button