शिरूर : रांजणगावात रंगला महागणपतीचा विवाह सोहळा | पुढारी

शिरूर : रांजणगावात रंगला महागणपतीचा विवाह सोहळा

शिरूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री गणेश प्रताप ग्रंथपारायण व श्री गणेश प्रवचन सप्ताह (दि. 21 ते 28 मे) सुरू आहे. सप्ताहात महागणपतीच्या मंदिरात रिद्धी- सिद्धी या देवतांबरोबर महागणपतीचा विवाह सोहळा शुक्रवारी (दि. 26) सायंकाळी थाटामाटात पार पडला.

सोहळा पाहण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील यांनी सांगितले. सिंदूर नावाच्या राक्षसाने ब—ह्मदेवाच्या रिद्धी-सिद्धी या दोन कन्यांना बंदिस्त केले होते. महागणपतीने त्यांची सुटका केल्यानंतर ब—ह्मदेवाच्या विनंतीवरून या दोघींशी महागणपतीने विवाह केल्याची कथा गणेश पुराणात आहे. त्यानुसार हा सोहळा साजरा करण्यात येतो. विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड महाराज यांचे श्री गणेश प्रवचन झाले. तसेच 27 मे रोजी ग्रंथदिंडी सोहळा थाटामाटात रांजणगाव पंचक्रोशीतून साजरा झाला.

रविवारी (दि. 28) ह.भ.प. परमेश्वर महाराज दंडवते यांचे काल्याचे कीर्तन होत आहे. देवस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर पाटील, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, पुजारी प्रसाद कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी, चेअरमन दत्तात्रय पाचुंदकर पाटील, पोलिस पाटील सारिका पाचुंदकर पाटील, ग्रामस्थ, देवस्थान कर्मचारी, इतर मान्यवर आणि भाविक उपस्थित होते.

Back to top button