नवी सांगवीतील रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग; प्रशासनाचे दुर्लक्ष | पुढारी

नवी सांगवीतील रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपळे गुरव(पुणे) : स्मार्ट सिटीअंतर्गत सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील रस्ते स्मार्ट केले आहेत. परंतु, रस्त्यावरच हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे रस्ते अतिक्रमण आणि अवैध पार्किंगच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे.

कारवाईनंतरही रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण

सांगवीतील मुख्य पाण्याची टाकी, साई चौक, कृष्णा चौक, काटेपुरम चौकात कायम वर्दळ असते. सध्या या रस्त्यांवर हातगाडी आणि अवैध पार्किंग केली जात असल्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. पूर्वी कृष्णा चौकात विद्युत नियंत्रक दिवे उभारण्यात आले होते. परंतु, स्मार्ट सिटीच्या कामासाठी ते काढण्यात आले आहेत. त्यानंतर पुन्हा विद्युत नियंत्रक दिवे उभारले गेले नाहीत. काही दिवसांपूर्वी अतिक्रणविरोधी पथकाने नवी सांगवी, पिंपळे गुरव भागातील अतिक्रमण हटविले होते. परंतु, पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यावर वाहने लावणार्‍यांवर कारवाई करा

वर्दळीच्या रस्त्यावर किंवा चौकात अवैधरित्या वाहनांचे पार्किंग वाढत असल्याने सर्वसामान्यांना रस्त्यावरून चालायचे कसे, असा प्रश्न पडला आहे. वर्दळच्या चौकात ट्रॅफिक वॉर्डन किंवा पोलिस कर्मचारी नियुक्त करावा आणि रस्त्यावर वाहने लावणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे.

Back to top button