कुणी शिक्षक देता का? शिक्षक ! पुणे जिल्ह्यातील तब्बल 123 शाळांमध्ये शिक्षकच नाही

कुणी शिक्षक देता का? शिक्षक ! पुणे जिल्ह्यातील तब्बल 123 शाळांमध्ये शिक्षकच नाही

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेची प्राथमिक बदली प्रक्रिया नुकतीच पार पडली. बदल्यानंतर आणि पूर्वीच्या इतर कारणांमुळे जिल्ह्यातील 123 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी एकही शिक्षक उपलब्ध नाही. तर आंतरजिल्हा बदली होऊन येणार्‍या शिक्षकांना या शाळांपैकी काही ठिकाणी देण्याची सध्या प्रक्रिया सुरू आहे. शून्य शिक्षक संख्याही सर्वाधिक भोर तालुक्यात असून, 44 शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध नाहीत.

राज्यातील शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर ठिकठिकाणी शिक्षक संख्येत असमानता निर्माण झाली. त्याचा फटका पुणे जिल्ह्यालादेखील बसला असून, 123 शाळा ह्या शून्य शिक्षक बनल्या. आता या शाळांवर शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. आंतरजिल्हा बदली होऊन आलेल्या शिक्षकांना या शून्य शिक्षक शाळांवर पाठवण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले होते.

त्यानंतर सध्या 51 शाळांवर शिक्षक देण्याची प्रक्रिया सुरू असून, निम्याहून अधिक शाळांचा प्रश्न तसाच गंभीर आहे. याबाबत काही पालक आणि लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद प्रशासनाकडे हेलपाटे मारत असून, आमच्या शाळेला शिक्षक द्या, म्हणून विनंती करत आहेत. कारण मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये याची भीती वाटत असल्याचे भोरहून आलेले राहुल शेळके सांगत होते. दरम्यान, अन्य 241 बदल्या झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केलेले नाही. कारण हे शिक्षक गेल्यानंतर शून्य शिक्षक शाळांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे सुमारे 245 शिक्षक सध्या महापालिकेतील समाविष्ट गावांमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी महापालिकेत राहण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली.

बदली शिक्षकांकडून तत्काळ कार्यमुक्तीची मागणी

शिक्षक मिळाल्याशिवाय 241 शिक्षकांना कार्यमुक्त न करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. परंतु बदली आदेश असल्यामुळे आम्हाला तत्काळ कार्यमुक्त करावे यासाठी शिक्षकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या शिक्षकांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेतली. आम्ही दहा ते बारा वर्षे अवघड दुर्गम ठिकाणी काम केले आहे. त्यामुळे आम्हाला कार्यमुक्त करावे, अशी मागणी केली.

शून्य शिक्षक संख्या असलेली एकही शाळा राहू नये, यासाठी नियोजन सुरू आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या 51 शिक्षकांना नव्याने नियुक्ती देऊन शून्य शिक्षक शाळांची संख्या कमी केली आहे. तसेच 241 शिक्षकांना कार्यमुक्त करण्याबाबत बदली झालेल्या शाळांमधील शिक्षकांची संख्या तसेच वीस पटसंख्यापेक्षा कमी असणार्‍या शाळा आणि त्याठिकाणी कार्यरत असणारे दोन शिक्षक शाळा यांची माहिती गटशिक्षणाधिकार्‍यांकडून मागवली आहे.
                           – चंद्रकांत वाघमारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news