पुणे : मोबाईल क्रमांक जोडण्यास टाळाटाळ; शिधापत्रिकाधारकांचा प्रतिसाद मिळेना | पुढारी

पुणे : मोबाईल क्रमांक जोडण्यास टाळाटाळ; शिधापत्रिकाधारकांचा प्रतिसाद मिळेना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिधापत्रिकेच्या व्यवस्थापन प्रणालीमध्ये (आरसीएमएस) लाभार्थ्यांना आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडणे आवश्यक आहे. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमधून केवळ 36.54 टक्के लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला मोबाईल जोडले आहेत. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून आता थेट स्वस्त धान्य विक्री केंद्रांवरील ई-पॉस यंत्रणेवरच शिधापत्रिकेला मोबाईल जोडण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये 24 लाख 91 हजार 546 लाभार्थीं असून, आत्तापर्यंत केवळ 91 हजार 342 लाभार्थ्यांनी शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडला आहे. बारामती तालुक्यात सर्वाधिक 3 लाख 25 हजार 438 लाभार्थ्यांची संख्या असून, या तालुक्यात जवळपास 50.77 टक्के लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक जोडणी केली आहे, तर सर्वाधिक कमी लाभार्थिसंख्या 33 हजार 91 वेल्हे तालुक्यात असताना तालुक्यातील 45.45 टक्के लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात मोबाईल क्रमांक जोडणी केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिली.
राज्य शासनाकडून गरीब, गरजूंना स्वस्त धान्य विक्री केंद्रांंवर अल्प दरात धान्याचे वितरण केले जाते.  शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक जोडणी करण्यात आली असली, तरी शिधापत्रिकेमध्ये कुटुंबातील व्यक्तींची नावे असतात. त्यापैकी मोजक्याच लाभार्थ्यांच्या बोटांचे ठसे घेतलेले असतात, इतर प्रमुखांना केंद्रावर गेल्यावर धान्याचा लाभ घेता येत नाही. त्यानुषंगाने मोबाईल क्रमांक जोडणी केल्यावर शिधापत्रिकेतील व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती विक्री केंद्रावर गेल्यास बोटांचा ठसा नसला, तरी जोडणी केलेल्या मोबाईलवर ओटीपी पाठवून धान्याचा लाभ घेता येणार आहे.

कोणालाही घेता येणार धान्य…

वन नेशन वन कार्ड’ म्हणून शिधापत्रिकेला मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट असलेल्या कुटुंबातील सदस्यांना सहज धान्याचा, वस्तूंचा लाभ मिळावा, यासाठी आधार कार्डला जोडण्यात आलेला मोबाईल क्रमांक आहे, त्याबरोबरच मोबाईल क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्याची कार्यवाही सुरू आहे. घरातील कोणालाही धान्य घेता येईल.
शिधापत्रिकेला मोबाईल क्रमांक जोडण्यासाठी तालुका पुरवठा कार्यालयात जाऊन प्रणालीद्वारे क्रमांक जोडण्यात येत होते. परंतु, ही सुविधा आता स्वस्त धान्य विक्री केंद्रांवरील ई-पॉस यंत्रांवर उपलब्ध करून दिली आहे. ज्या लाभार्थ्यांना धान्य मिळाल्याचे संदेश मोबाईलवर येत नाहीत, त्यांनी त्यांचे मोबाईल क्रमांक रास्त भाव दुकानात किंवा तहसील कार्यालयात जाऊन जोडावेत.
                                                          सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

Back to top button