पुणे : बनावट लुटीचे पुरावे तयार करूनही ‘दृश्यम’ जाळ्यात | पुढारी

पुणे : बनावट लुटीचे पुरावे तयार करूनही ‘दृश्यम’ जाळ्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : स्वत:च्याच लुटीचा बनाव त्याने पुरेपूर तयार केला होता. मालकाची रोकड घेऊन त्याने दुपारी पोबारा केला पण संध्याकाळी मालकाकडे येऊन आपल्याला लुटल्याचे सांगितले. पोलिसांनी पाच पथके तयार केली. त्यांनाही सुरुवातीला आरोपीवर संशय आला नाही. अगदी सीसीटीव्हीचाही त्याने बारकाईने अभ्यास करून एक वेगळेच ’दृश्यम’ सर्वांसमोर ठेवले.

मात्र, पोलिसांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. दत्तवाडी पोलिसांनी अशाच एका गुन्ह्याचा छडा लावला. मालकाची 22 लाख 65 हजार रुपयांची रोकड घेऊन फरार झालेल्या कामगाराने आपलेच अपहरण करून लुटण्यात आल्याचा बनाव रचला. एवढेच नाही, तर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल केला. अखेर त्याने कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या लुटीचा बनाव रचल्याची कबुली देत पळवलेली 22 लाख 44 हजारांची रोकड परत केली.

बसप्पा वाल्मिक शिंगरे (वय 36, रा. मूळ सोलापूर,सध्या रामतनय अपार्टमेंट, लॉ कॉलेज रोड) असे अटक केलेल्या कामगाराचे नाव आहे. त्याच्या विरुद्ध बांधकाम व्यावसायिकाने (तो काम करत असलेल्या मालकाने) दिलेल्या फिर्यादीनुसार विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना सोमवारी (दि.22) दुपारी शनिवार पेठ भागात घडली होती.

हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त आर.राजा, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलिस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे, प्रशांत शिंदे, काशिनाथ कोळेकर, अनुप पंडीत, प्रमोद भोसले, अनिस तांबोळी, नवनाथ भोसले, सद्दाम शेख, दयानंद तेलंगे यांच्या पथकाने केली.

सीसीटीव्ही फुटेज अन् गुन्ह्याचा छडा

रोकड पळवल्याच्या रात्री बसप्पा मालकाच्या घरी परतला. त्याने तो पळून गेला नव्हता तर नीलायम पुलाशेजारी चार अज्ञात चोरट्यांनी त्याच्या दुचाकीला कट मारून चारचाकी गाडीतून त्याचे अपहरण केले. त्यानंतर बेदम मारहाण करत त्याच्याजवळील रोकड पळवली अशी स्टोरी विश्रामबाग पोलिस आणि मालकाला सांगितली. त्यांनाही खरे वाटले म्हणून दत्तवाडी पोलिस ठाण्यात बसप्पानेच तक्रार देत गुन्हा दाखल केला.

मात्र, तो सांगत असलेल्या स्टोरीबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व गुन्हे निरीक्षक विजय खोमणे यांना संशय आला. त्यांनी पाच तपास पथके तयार करून गुन्ह्याचा छडा लावण्याचे ठरवले. त्यानुसार लॉ कॉलेज रोडपासून ते विश्रामबाग हद्दीतील पेपर गल्ली -नीलायम पूल, स्वारगेट- कोथरूड- भूगाव परिसरातील 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलिसी खाक्या दाखवताच एका ठिकाणी सांगण्यात तो गडबडला अन् पोलिसांनी तोच धागा पकडून गुन्ह्याचा छडा लावला. त्याने डेक्कन येथील एका हॉस्पिटलच्या आवारात पार्क केलेल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले पैसे पोलिसांच्या हवाली केले. पुढील तपासासाठी त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Back to top button