पुणे : कचरा वाहतूक क्षमता तिपटीने वाढणार | पुढारी

पुणे : कचरा वाहतूक क्षमता तिपटीने वाढणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या ताफ्यात तब्बल 20 ते 22 टन कचरा एकाच वेळी वाहतूक करणारे आणि वॉकिंग फ्लोरची सुविधा असलेले तीन ट्रक दाखल झाले आहेत. या ट्रकचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, कीथ कंपनीच्या अध्यक्षा लिंडसे फॉस्टर ड्रॅग्रो, संचालक वरुण गजरा, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत आदी उपस्थित होते.

महापालिकेकडून सध्या शहरात कचरा वाहतुकीसाठी हायवा ट्रक वापरण्यात येतात. त्यांची क्षमता 5 ते 10 टनांच्या आसपास आहे.
तसेच, या ट्रकमध्ये कचरा भरल्यानंतर तो आत दाबण्याची यंत्रणा नाही. सध्याच्या गाड्यांमध्ये कचरा भरण्यासाठी व उतरविण्यासाठी अर्धा ते पाऊण तास जातो. तसेच कचरा मोठ्या प्रमाणात बाजूला पडतो.

केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून प्रायोगिक तत्त्वावर सुमारे अडीच कोटी रुपयांचे अत्याधुनिक तीन ट्रक खरेदी केले आहेत. या नवीन ट्रकमध्ये वॉकिंग फ्लोर असून, कचरा 5 ते 10 मिनिटांत भरता येतो. आतमध्ये पडलेला कचरा स्वयंचलित यंत्रणेत दाबला जातो. परिणामी, जुन्या हायवाच्या तीन ट्रकमध्ये बसणारा कचरा कीथच्या एकाच ट्रकमध्ये बसतो. परिणामी, कचरा वाहतुकीचा खर्चही कमी होणार आहे, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Back to top button