पुणे : कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड पुढील आठवड्यात | पुढारी

पुणे : कात्रज दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड पुढील आठवड्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीच्या चेअरमन केशरताई पवार यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिलेला राजीनामा शनिवारी (दि. 27) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. अध्यक्षपदाची निवड पुढील आठवड्यात होणार आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत भगवान पासलकर (वेल्हा) आणि ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के (हवेली) यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

जिल्हा दूध संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक संचालक आहेत. निवडणूक लढविताना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने एकत्रित निवडणूक लढविली आहे. मात्र, दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदावर नवीन संचालकांना संधी द्यावी, असा राष्ट्रवादीचा अजेंडा राहिला आहे. त्यानुसार कात्रजमध्ये अध्यक्षपदाचा बदल झाल्याचे सांगण्यात येत आहे. उपाध्यक्ष राहुल दिवेकर यांच्या पदाबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नसून, बैठकीत तशी चर्चाही झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

येत्या मंगळवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे अध्यक्षपदाच्या नावांवर चर्चा होऊन शिक्कामोर्तब अपेक्षित मानले जात आहे. त्यादृष्टीने संघाचा आर्थिक डोलारा सुस्थितीत येण्यासाठी ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के यांच्याकडे नेतृत्व देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, राजकीयदृष्ट्या पक्षाला ताकद मिळण्यासाठी आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करून ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांच्या नावाबाबत पक्षश्रेष्ठी विचार करू शकतात.

या शिवाय पदाधिकारी बदलासाठी आक्रमक झालेल्या एका गटाकडूनही माजी अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, खेडचे अरुण चांभारे यांची नावे पुढे येत आहेत. माजी अध्यक्ष विष्णू हिंगे यांचेही नाव अचानक चर्चेत येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीकडून धक्कातंत्र वापरुन चर्चेत नसलेल्या अन्य पक्षाच्या एखाद्या उमेदवाराचा पक्षप्रवेश करुन नव्या चेहर्‍याला संधी दिली जाण्यावरही विचार केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राष्ट्रवादीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद पुरंदरमधील प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्याकडे दिले. म्हणजेच या ठिकाणी पूर्वी अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या उमेदवाराकडे बँकेचा कारभार देण्यात आला. हाच मुद्दा कात्रज दूध संघाला लागू करण्यात आला नाही आणि संघाच्या आर्थिक अडचणी वाढल्याची चर्चा कायम होत असते.

मात्र, पक्षनेतृत्वाने त्याकडे डोळेझाक केल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारकडून विद्यमान संचालक मंडळाच्या कारभाराची चौकशी सुरू आहे. त्याचा निर्णय भविष्यात काय होईल, हे पुढे येईलच. मात्र, अशा स्थितीत अध्यक्षपदी सर्वांना बरोबर घेऊन जाणार्‍या आणि वार्षिक 300 कोटींची उलाढाल असलेल्या कात्रज दूध संघाची आर्थिक घडी पूर्वपदावर आणणार्‍या संचालकांच्या नावाचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा दुग्ध वर्तुळात आहे.

Back to top button