पिंपरी : डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन; राजकीय दबावावर येणार नियंत्रण

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी (गट अ, वर्ग 2) बदल्यांसाठी संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार केली आहे. त्यामुळे डॉक्टरांना ऑनलाइन अर्ज करून बदली करून घेता येणार आहे. पर्यायाने, राजकीय दबाव वापरुन बदल्या थांबविणे किंवा बदली करुन घेणे यावर नियंत्रण येणार आहे.
बदल्यांसाठी राबविण्यात येणार्या ऑनलाइन प्रक्रियेमुळे एकाच ठिकाणी वीस-वीस वर्ष ठाण मांडून बसलेल्या डॉक्टरांच्या बदल्या होऊ शकणार आहेत. बदल्यांसाठी अर्ज करण्यासाठी 20 मे पर्यंत तारीख देण्यात आली होती. 13 मे पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली. त्यानुसार वैद्यकीय अधिकार्यांनी अर्ज केले आहेत. ज्यांची सेवा जास्त आहे. डॉक्टरांची पदावरील सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हता पाहून शासनातर्फे डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन केल्या जाणार आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेत होणारा मानवी हस्तक्षेप थांबणार आहे.
सॉफ्टवेअरचा प्रभावी वापर
आरोग्य विभागाने निष्पक्ष बदल्यांसाठी एक ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार केले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन हे सॉफ्टवेअर तयार केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने डॉक्टरांची माहिती ऑनलाईन भरुन घेण्यात आली आहे. अर्ज भरताना डॉक्टरांना 10 प्राधान्यक्रम निवडण्याची संधी देण्यात आली आहे.
एका ठिकाणी 20़ वर्ष असणार्या डॉक्टरांच्याही बदल्या
काही डॉक्टरांनी बदल्यांसाठी अर्ज केलेला नाही. मात्र, नियमानुसार एका ठिकाणी 3 वर्ष पुर्ण झालेल्या डॉक्टरांबरोबरच एका ठिकाणी 20 वर्ष ठाण मांडून बसलेल्या डॉक्टरांच्या देखील बदल्या होणार आहेत. अंदाजे 2 हजार डॉक्टर हे एका ठिकाणी तीन वर्ष सेवा पुर्ण झालेले आहेत.
अतिरिक्त खर्चात होणार बचत
शासनाने डॉक्टरांच्या बदल्या ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतल्याने मानवी हस्तक्षेप बंद झाला आहे. एका संस्थेत 3 वर्ष पूर्ण झालेल्यांनी ऑनलाइन ट्रान्सफर अॅपवर अर्ज करुन पोस्टींग निवडायची आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या होणार्या अतिरिक्त खर्चात बचत होणार आहे.
शासनाच्या बदली अधिनियम 2018 अनुसार वैद्यकीय अधिकारी (गट अ, वर्ग 2) मधील डॉक्टरांच्या बदल्या होणार आहेत. डॉक्टरांनी भरलेली ऑनलाइन माहिती तपासण्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर यादी लागेल. त्यावर काही हरकती असल्यास डॉक्टरांनी त्याबाबत ऑनलाइन आक्षेप द्यायचे आहेत. 31 मे रोजी या बदल्या होतील. तत्पूर्वी, सर्व कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
– डॉ. राधाकिशन पवार,
उपसंचालक, आरोग्य सेवा.