पिंपरी : मावळ पॅटर्न मोडणार? पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आक्रमक | पुढारी

पिंपरी : मावळ पॅटर्न मोडणार? पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे आक्रमक

संतोष शिंदे

पिंपरी(पुणे) : राजकीय क्षेत्रात दबदबा असणार्‍या किशोर आवारे, प्रवीण गोपाळे यांच्या खुनानंतर गुन्हेगारीचा मावळ पॅटर्न राज्यभर गाजला. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनायककुमार चौबे आक्रमक झाले आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेची काही पथके मावळ परिसरातच स्थलांतरित करण्यात आली आहेत. तसेच, त्यांना वेगवेगळे टास्क देण्यात आले आहेत. त्यामुळे ‘मावळ पॅटर्न’ मोडून काढण्यासाठी पोलिसांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

…या पथकांचे केले स्थलांतर

गुंडाविरोधी पथक आणि गुन्हेशाखेच्या युनिट पाचच्या पथकाचे कार्यालय आता तळेगाव दाभाडे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. राजकीय व्यक्तींच्या एकापाठोपाठ तळेगाव दाभाडे परिसरात झालेल्या खुनाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, देहूरोड विभागाची जबाबदारी आता सहायक पोलिस आयुक्त पद्माकर घनवट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांना दररोज तळेगाव दाभाडे परिसराला भेट देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

‘एसआयटी’कडून शक्यतांची पडताळणी सुरू

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांची 12 मे रोजी नगर परिषदेत भरदिवसा गोळीबार आणि कोयत्याने घाव घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सात आरोपींना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास करीत असताना ‘एसआयटी’कडून सर्व बाबींची पडताळणी केली जात आहे.

…म्हणून तळेगावमध्ये आजही तणाव

किशोर आवारे यांच्या हत्येच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या भावासह अन्य एका कार्यकर्त्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा गुन्हा राजकीय सूडापोटी दाखल करण्यात आल्याचे आमदार शेळके यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आवारे आणि शेळके समर्थकांनी एकत्र येत परस्पर विरोधी निदर्शने केली होती. या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मावळ परिसरात आजही तणावाचे वातावरण आहे.

अधिकारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

तळेगाव दाभाडे येथील गुन्हेगारांचे मुंबई कनेक्शन आहे. त्यामुळे आरोपी लपण्यासाठी मावळ पट्ट्यात येत असल्याचे यापूर्वीच्या घटनांमधून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड आणि मावळ, चाकण परिसरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन केल्यानंतर आता शहराला दोन पोलिस उपायुक्त, एक सहायक आयुक्त मिळावा, यासाठी पोलिस आयुक्त चौबे यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत.

तळेगावमधून राहणार शहरावर वॉच

गुंडाविरोधी पथक संपूर्ण शहरासाठी काम करते. तर, गुन्हेशाखेचे युनिट पाच हे देहूरोड, तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी, शिरगांव या भागासाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी गुंडविरोधीपथक आकुर्डी येथे बसून कारभार चालवित होते. तर, युनिट पाचचे पथक हे देहूरोड पोलिस ठाण्याच्या परिसरातील कार्यालयातून कामकाज करीत होते. आता गुंडविरोधीपथक तळेगाव येथून शहरावर वॉच ठेवणार आहे.

सायबर सेलही अ‍ॅक्टिव्ह

किशोर आवारे खून प्रकरणानंतर दोन गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे सायबर सेलही अ‍ॅक्टिव्ह करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍यांची माहिती संकलित करण्याचे काम सायबर सेलकडून सुरू आहे.

साध्या वेशातील पोलिसांचा वावर

आवारे खून प्रकरणानंतर तळेगाव दाभाडे परिसरात कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर येथील गुन्हेगारांना वेसण घालण्यासाठी पोलिसांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गुन्हेगारांची कुंडली काढण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही नियुक्त करण्याचे आदेश पोलिस आयुक्त चौबे यांनी दिले आहेत.

तळेगाव परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी वेळप्रसंगी आणखी कठोर पाऊले उचलण्यात येतील.

                            – विनयकुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड.

Back to top button