पुणे : पानशेत धरणातील पाणी दूषित; मत्स्योत्पादन केंद्रामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : शहर व जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्या पानशेत ( नरवीर तानाजी सागर) धरणातील आंबेगाव खुर्द कुरवटी (ता. वेल्हे) येथील मत्स्योत्पादन केंद्रामुळे धरणातील पाणी दूषित होत आहे. राजकीय दबावामुळे प्रशासन केंद्रावर कारवाई करत नाही, अशी तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.
धरणाच्या मुख्य भिंतीपासून चार किलोमीटर अंतरावर आंबेगाव खुर्द जवळीलधरण क्षेत्रात मत्स्योत्पादन केंद्राचे दोन मोठे तराफे आहेत. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळापासून आरोग्य, जलसंपदा विभागाकडे स्थानिक शेतकरी हेलपाटे मारत आहेत. मात्र, अद्यापही कोणीही दखल घेतली नाही. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारी मत्स्योत्पादन केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याची नागरिकांची मागणी आहे.
आंबेगाव खुर्द, कुरवटी व परिसरातील खेड्यापाड्यात नळाद्वारे येणार्या पाण्यात मृत माशांचे अवशेष येत आहेत. तसेच पाण्याला दुर्गंधी येत आहे. तिरावर फेकलेले मृत मासे खाण्यासाठी येणार्या मोकाट कुत्र्यांमुळे शेतकर्यांना उपद्रव होत आहे. याबाबत वेल्हे तालुका पंचायत समितीचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत कराळे म्हणाले, धरणातील तसेच आंबेगाव खुर्द, कुरवटी व इतर ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन बदाणे म्हणाले, पानशेत धरणातील मत्स्योत्पादन केंद्राची पाहणी करण्याचे आदेश शाखा अभियंता यांनी दिले आहेत. केंद्रामुळे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने कारवाई केली जाईल.
आंबेगाव खुर्दचे उपसरपंच राजू कडू म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून आंबेगाव खुर्द, कुरवटी परिसरात मत्स्योत्पादन केंद्राची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पाण्याची चव बदलली असून, उग्र वास येत आहे. आंबेगाव खुर्दचे माजी सरपंच बापूसाहेब पासलकर म्हणाले, केंद्रातील माशांसाठी दररोज शेकडो किलो सडलेले मांस व इतर खाद्यपदार्थ पाण्यात टाकले जातात. धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहते पाणी कमी झाले आहे. त्यामुळे सडलेले खाद्यपदार्थ, तसेच मृत मासे साठून दुर्गंधी सुटली आहे.