बारामती : शासकीय रुग्णालयातील तिघांना मारहाण | पुढारी

बारामती : शासकीय रुग्णालयातील तिघांना मारहाण

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयात लिपिकासह अन्य दोघा कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 25) घडली. रसूल शरीफ शेख (रा. बारामती) असे त्याचे नाव आहे. वरिष्ठ लिपिक नारायण माणिक काळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

शेख हा रुग्णालयात आला असता केस पेपर काढण्यासाठी फिर्यादीने त्याच्याकडे 20 रुपये शासकीय फीची मागणी केली. शेख याने 10 रुपये दिले. त्यावर आणखी 10 रुपयांची मागणी केली असता चिडून जाऊन शेखने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. फिर्यादी केबिनच्या बाहेर आले असता शेखने त्यांना मारहाण केली. तसेच टेबलवरील केसपेपर फेकून दिले.

तेथून तो ओपीडी क्रमांक 13 येथे गेला. डॉक्टरांनी त्याला सोनोग्राफी करण्यास सांगितले. त्यानुसार तो सोनोग्राफी विभागातील अधिपरिचारिकेकडे गेला. त्यांनी 10 जून ही तारीख दिली असता शेखने तातडीने सोनोग्राफी करायची आहे, असे सांगत तेथील सुरक्षारक्षक सचिन गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

औषध विभागात काम करणार्‍या महिला कर्मचारी तेथे आल्या असता, त्यांनाही मारहाण केली. तसेच बाहेर आल्यावर तुझ्याकडे बघतो, अशी धमकी दिली. या प्रकारानंतर प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे तेथे आले. त्यांनी शेखकडे विचारणा केली असता, शेखने त्यांनाही शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार शेखवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button