ज्यांची ताकद जास्त, त्यांना पुणे लोकसभेची जागा मिळावी : अजित पवार | पुढारी

ज्यांची ताकद जास्त, त्यांना पुणे लोकसभेची जागा मिळावी : अजित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. मला मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांची जिथं जास्त ताकद आहे, तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला तिकीट द्यायचे. पुण्यात कुणाची ताकद आहे, हे आधीच्या निवडणुकीत कुणाचे किती लोक निवडून आले, यावरून राष्ट्रवादीची ताकद आहे, हे सर्वांना माहीत आहे. महाविकास आघाडीत ज्यांची जास्त ताकद त्यांना ती जागा मिळावी. मित्रपक्षाला देखील यावर बोलण्याचा अधिकार आहे, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी  व्यक्त केले.
पुणे लोकसभा मतदारसंघ जागा वाटपाविषयी महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. दरम्यान, टिंबर मार्केट आग दुर्घटनास्थळी पवार यांनी भेट देऊन पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केली. पवार म्हणाले की, पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी  राहिला. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही, असे वाटत होते. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत नगरसेवक आणि आमदारांची संख्या लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद दिसून येते. त्यामुळे आता जी निवडणूक जाहीर होईल, मित्रपक्षाची ताकद जास्त असेल ती जागा त्यांना मिळावी. मागील निवडणुकीचा अंदाज घ्यावा एवढीच आमची भूमिका आहे, असे  पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील मंदिरांबद्दल आदेश काढण्यात आला आहे. त्यावर पवार म्हणाले की, आपल्या येथील एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये केरळ येथील नागरिक दर्शनावेळी लुंगी घालून आले, तर त्यांना दर्शन द्यायला हवे. आपल्या संस्कृतीप्रमाणे मंदिरात दर्शनाला जाताना तोकडे कपडे घालून जाऊ नये, असेही पवार म्हणाले.

तपासात वेगळे आकडे येतात

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुणे जिल्ह्यात लव्ह जिहाद घडल्याचा आरोप केला आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. खरी वस्तुस्थिती पोलिसांनी समोर आणली पाहिजे. अनेकवेळा आरोप केला जातो, तपासात वेगळेच चित्र समोर येते. आम्ही ही बाब सभागृहात देखील पाहिली असून, त्वेषाने सभागृहात बोलले जाते. तपासातून वेगळेच आकडे समोर येतात, असे सांगत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला.

Back to top button