राज्यात 31 मेपर्यंत अवकाळीचा अंदाज; जोरदार वार्‍यांमुळे मान्सूनला अनुकूल स्थिती | पुढारी

राज्यात 31 मेपर्यंत अवकाळीचा अंदाज; जोरदार वार्‍यांमुळे मान्सूनला अनुकूल स्थिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत 31 मेपर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे, असा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांपर्यंत घसरला आहे. दरम्यान, मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण असल्यामुळे येत्या दोन दिवसांत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापणार आहे. दरम्यान राज्याच्या सर्वच भागांत गेल्या तीन आठवड्यांपासून कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. कमाल तापमानाचा पारा 40 ते 45 अंशांच्या आसपास पोहचला.

त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले होते. आता मात्र राज्याच्या सर्वच भागांत मेघगर्जना, विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस बरसणार आहे. काही भागात अवकाळी मुसळधार बरसेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, शनिवारी चंद्रपूर शहर जिल्ह्याचा कमाल तापमानाचा पारा 43. 2 अंशांवर पोहचला होता. राजस्थान ते मध्य प्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. तसेच दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे वाहत आहेत.

या स्थितीमुळे राज्यात अवकाळी पाऊस वाढणार आहे. मान्सून दोन दिवसांत अंदमान, निकोबार, बंगालचा उपसागर व्यापणार बंगालच्या उपसागरात सध्या जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकाच्या काही भागातही पाऊस हजेरी लावणार आहे,अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनुकूल स्थिती तसेच वा-यांचा वेग योग्य दिशेने असल्यामुळे अंदमान, निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागरातील काही भागांत येत्या दोन दिवसांत मान्सून दाखल होणार आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वीच या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ईशान्य राजस्थानपासून ते मध्यप्रदेशपर्यंत चक्रीय स्थिती आहे, तर बंगालच्या उपसागरापासून ते ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांपर्यंत जोरदार वारे वाहत आहेत. या वा-यांमुळेच मान्सूनचा प्रवास सुकर होत असून, पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे.

Back to top button