जात पडताळणी समितीची फसवणूक, नेवाशाच्या मापारी विरोधात गुन्हा; प्रस्तावास अनधिकृतपणे उतारा जोडला | पुढारी

जात पडताळणी समितीची फसवणूक, नेवाशाच्या मापारी विरोधात गुन्हा; प्रस्तावास अनधिकृतपणे उतारा जोडला

नगर, पुढारी वृत्तसेवा: जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावाला अनधिकृतपणे उतारा जोडून, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची फसवणूक केल्याप्रकरणी नेवासा येथील स्वप्नील राजेंद्र मापारी याच्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस निरीक्षक सईदखाँ पठाण यांनी फिर्याद दिली आहे. स्वप्निल मापारी याने 16 फेब्रुवारी 2022 रोजी त्याचा भाऊ अनिकेत राजेंद्र मापारी यांच्या वाणी जातीच्या जात प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणात जोडलेला गणपती महादू (आडनाव नमूद नाही) यांना मुलगी झाल्याचा सन 1920 चा गाव नमुना नं.14 चा उतारा अर्जदार आदित्य बालाजी भवर (रा. खामगाव ता. नेवासा) याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्तावाला अनधिकृतपणे जोडून तसा प्रस्ताव जिल्हा जात पडताळणी समितीकडे सादर केला होता.

या संदर्भात पोलिस निरीक्षक पठाण यांनी चौकशी केली असता, आदित्य बालाजी भवरचा वाणी जातीचा प्रस्ताव नातेवाईक स्वप्नील राजेंद्र मापारीने तयार केला असून, तो समितीकडे सादर केल्याचे समोर आले. यामध्ये त्याने भाऊ अनिकेत राजेंद्र मापारी यांच्या वाणी जातीच्या प्रमाणपत्र पडताळणी शैक्षणिक प्रकरणात जोडलेला गणपती महादू (आडनाव नमूद नाही) यांना मुलगी झाल्याचा 1920 चा गाव नमुना उतारा जोडला आहे. उतारा जोडून आदित्य भवर यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

Back to top button