शिरूरच्या विकासासाठी तब्बल 5 कोटींचा निधी, माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

शिरूरच्या विकासासाठी तब्बल 5 कोटींचा निधी, माजी खासदार आढळराव पाटील यांची माहिती

शिरुर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: भविष्याच्या दृष्टीने शिरूर शहर सुंदर होण्यासाठी विविध विकासकामांसाठी पाच कोटींपेक्षा जास्त निधी आणला आहे. नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्याशी चर्चा करून ही कामे सुरू आहेत. या सरकारच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असल्याचे मत शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून व पालकमंत्री सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शिरूर शहरातील पाच कोटी रुपयांच्या विकासकामांसाठी आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून निधी आणण्यात आला. त्याच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे, आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे, शिरूर शहरप्रमुख मयूर थोरात, माजी नगरसेवक विठ्ठल पवार, माजी नगरसेविका उज्ज्वला बरमेचा, रोहिणी बनकर, संगीता मल्लाव, ज्योती लोखंडे, अंजली थोरात, सुनीता कुरुंदळे, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे, उपशहर प्रमुख भरत जोशी, गणेश गिरे, माजी नगराध्यक्ष नसीम खान आदींसह नागरिक उपस्थित होते.

या वेळी बोलताना आढळराव म्हणाले, शिरूर शहरातील महत्त्वाची पाणीपुरवठा योजनेची जी कामे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत, त्यासाठी प्रकाश धारीवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण स्वत: महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. यानंतर 70 कोटी 54 लाख रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला असून एक महिन्यात या योजनेला मंजुरी मिळून शिरूर शहराचा महत्त्वाचा विषय मार्गी लागेल. शहरातील लाटेआळी येथील शाळेसाठी मुख्यमंत्री वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून दीड कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या शाळेसाठी आणखी दीड कोटी रुपये निधी मंजूर करून आणणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

या वेळी माजी नगरसेविका अंजली थोरात यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास झाला आहे. दशक्रिया घाटाची सुधारणा व्हावी, ही नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. त्यासाठी शिवसेना नेते आढळराव पाटील यांच्या प्रयत्नातून निधी मिळाला. यासह शहरात अनेक विकासकामे होणार असल्याचे अंजली थोरात यांनी सांगितले.शिरूर नगरपरिषद घनकचरा येथे (कचरा डेपो) शेड व पिटसची उभारणी करणे (1 कोटी 68 लक्ष), शिरूर दशक्रियाविधी घाटाचे नूतनीकरण करणे (एक कोटी), शिरूर नगरपरिषदेसाठी जेटिंग मशीन खरेदी करणे (35 लक्ष), शिरूर नगरपरिषदेस विद्युतविषयक कामांसाठी हायड्रॉलिक वाहन खरेदी करणे (25 लक्ष), शिरूर शहरातील मुंबई बाजार गणेश मंदिर ते अग्निशामक इमारतीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे (56 लक्ष), शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करणे (49.40 लक्ष), शिरूर शहर कुंभारआळी येथील लहान तालमीस अतिरिक्त मजला बांधणे (25.50 लक्ष) आणि शिरूर शहर मुस्लिम समाज दफनभूमी संरक्षकभिंत बांधणे व अंतर्गत सुधारणा करणे (20 लक्ष) आदी कामे होणार असल्याचे अंजली थोरात यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news