इंदापूर : दिवाळीपर्यंत दुधाचे खरेदी दर कमी होणार नाहीत : दशरथ माने | पुढारी

इंदापूर : दिवाळीपर्यंत दुधाचे खरेदी दर कमी होणार नाहीत : दशरथ माने

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आताची जागतिक स्थिती पाहता दिवाळीपर्यंत दुधाचे खरेदी दर कमी होणार नाहीत, शेतकर्‍यानी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख व महाराष्ट्र राज्य खासगी दूध प्रकल्प संघाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी केले आहे. इंदापूर येथे पत्रकार परिषदेत माने बोलत होते. इंदापूर येथे पत्रकार परिषदेत माने बोलत होते.

पत्रकार परिषदेत माने म्हणाले, दुधाचे खरेदी दर वाढवणे किंवा कमी करणे हे कुठल्याही एका व्यक्तीवर, संस्थेवर, संघावर, राज्यावर किंवा देशावर अवलंबून नसून, दुधाच्या जागतिक उत्पादनासह मागणी आणि पुरवठा यावर दुधाचे दर अवलंबून असतात. शेतकर्‍याच्या दुधाला चांगला खरेदी दर मिळाला पाहिजे, अशी आमचीही मागणी आहे.

2018-19 मध्ये ज्यावेळी दुधाचे खरेदी दर वीस, बावीस रुपयांवर आले होते, त्यावेळी मी स्वत: इंदापुरात शेतकर्‍यांबरोबर महाराष्ट्रातील फार मोठे आंदोलन केले होते.आयातीसाठी कर लावणे आणि निर्यातीसाठी अनुदान देणं हे सरकारच्या हातात असते. राज्य शासनाचा असणारा दुधाचा सध्याचा निश्चित खरेदी दर हा 25 रुपये आहे. तो सुधारण्याची गरज आहे. त्यामुळे आता राज्यातील दुधाचे खरेदी दर हे केवळ एका ’सोनाई’ संस्थेमुळे कमी झाले आहेत, असा आरोप करणे चुकीचे आहे.

माझे स्वत:चे दीड हजार लिटर दूध असून, मलाही वाटते शेतकर्‍याला दुधाला प्रति लिटरला चाळीस रुपये खरेदी दर मिळाला पाहिजे. राज्यातील जवळपास दहा लाख दूध उत्पादक शेतकरी आहेत. यामध्ये सुमारे 33 ते 35 लाख लिटर सोनाईचे दूध संकलन आहे. सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सरकारी आणि सहकारी संस्था सोडल्या, तर अनेक दूध संस्था बंद पडल्या आहेत,असेही माने यांनी सांगितले.

दूध खरेदी दरात ‘सोनाई’चा हस्तक्षेप नसतो

दूध खरेदी दराबाबत ‘सोनाई’चा हस्तक्षेप नसतो.तो त्याच्या मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असतो. शेतकर्‍यांच्या दुधाला चांगला खरेदी दर मिळाला पाहिजे, अशी ‘सोनाई’ची मागणी असून, आता जे दुधाचे खरेदी दर उतरले आहेत ती सर्वांत कमी पातळी आहे. शेतकर्‍यांनी घाबरून न जाता दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन माने यांनी केले. सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक युवक व महिलांना रोजगार उपलब्ध झाला,दूध खरेदी दरवाढीसाठी आंदोलन करावे लागले तर मी शेतकर्‍यांबरोबर असेल, असेही माने यांनी स्पष्ट केले.

Back to top button