पिंपरी : पर्यावरणपूरक संकल्पनेत महापालिका पिछाडीवर | पुढारी

पिंपरी : पर्यावरणपूरक संकल्पनेत महापालिका पिछाडीवर

दीपेश सुराणा

पिंपरी(पुणे) : महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य इमारतीसह 8 क्षेत्रीय कार्यालये किंवा पालिका मालकीच्या अन्य इमारतींमध्ये ग्रीन बिल्डिंग (पर्यावरणपूरक इमारत) संकल्पना प्रत्यक्षात साकारलेली नाही. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) आकुर्डी येथील इमारत मात्र ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेनुसारच साकारलेली आहे. महापालिका ग्रीन बिल्डिंगबाबत यापूर्वी गंभीर नव्हती. मात्र, आता चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील मोकळ्या जागेत साकारणारी महापालिकेची नवीन इमारत ही ग्रीन बिल्डिंग असणार आहे.

महापालिका सध्या पिछाडीवर

महापालिकेची पिंपरी येथे  असलेली चार मजली इमारत ही ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेला अनुसरून बांधलेली नाही. त्याचप्रमाणे, महापालिकेची 8 क्षेत्रीय कार्यालये, रुग्णालयांच्या तसेच, शाळांच्या इमारतीदेखील ग्रीन बिल्डिंगच्या संकल्पनेवर खर्‍या उतरत नाहीत. त्यामुळे एका अर्थाने ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेत महापालिका सध्या तरी पिछाडीवर आहे.

पीएमआरडीएची इमारत ग्रीन बिल्डिंग

पिंपरी-चिंचवड़ नवनगर विकास प्राधिकरण अस्तित्त्वात असताना प्राधिकरणाची आकुर्डीतील इमारत पर्यावरणपूरक उभारण्यात आली. प्राधिकरणाचे आता पीएमआरडीएमध्ये विलीनीकरण झालेले आहे. त्यामुळे ही इमारत आता पीएमआरडीएच्या अखत्यारित आहे. 2012 मध्ये या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. इमारतीमध्ये 100 किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा आहे.

इमारतीत खेळती हवा राहावी आणि पुरेसा सूर्यप्रकाश यावा, या दृष्टीने मोठ्या खिडक्या, क्रॉस व्हेंटिलेशन आणि इमारतीची रचना करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे, येथे लॅण्डस्कॅपिंग करताना देशी झाडांचा वापर करण्यात आला आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारलेली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा बागेतील झाडांसाठी पुनर्वापर केला जात आहे. इमारत बांधकामामध्ये फ्लाय अ‍ॅश विटांचा वापर करण्यात आला आहे, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.

ग्रीन बिल्डिंग म्हणजे काय ?

ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेत प्रामुख्याने सौर ऊर्जेचा उष्णता व प्रकाश मिळविण्यासाठी वापर केला जातो. त्याचप्रमाणे, इमारतीत नैसर्गिक वायूवीजन म्हणजे खेळती हवा आणि सूर्यप्रकाश कसा राहील, या दृष्टीने इमारतीची रचना केलेली असते. इमारतीचे बांधकाम करताना कमी ऊर्जा लागणार्‍या तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जातो. पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर हा ग्रीन बिल्डिंगचा मुख्य उद्देश आहे. इमारतीतील हवेचा दर्जा योग्य राखणे, पावसाळी पाण्याचे संकलन (रेन वॉटर हार्वेस्टिंग), सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर तसेच, घनकचर्‍यापासून खत व बायोगॅस या बाबींना पर्यावरणपूरक इमारतीत प्राधान्य दिले जाते.

पालिकेची प्रस्तावित इमारत पर्यावरणपूरक

चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील मोकळ्या जागेत उभारण्यात येणारी महापालिकेची नवीन इमारत मात्र पर्यावरणपूरक असणार आहे. या इमारतीचे बांधकाम करताना ग्रीन बिल्डिंग संकल्पनेनुसार त्याचे बांधकाम व रचना केली जाणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे 286 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. इमारतीचे
भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे.

महापालिकेची प्रशासकीय इमारत तसेच महापालिका मालकीच्या अन्य इमारती या ग्रीन बिल्डिंग या संकल्पनेनुसार नाहीत. तथापि, महापालिकेची चिंचवड येथे प्रस्तावित असलेली नवीन इमारत मात्र पर्यावरणपूरक (ग्रीन बिल्डिंग) असणार आहे. त्यासाठी आवश्यक नियोजन केले जात आहे.

                                      – मकरंद निकम, शहर अभियंता, महापालिका

 

Back to top button