पुणे जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ प्रकरण; पीडित मुलीला पडळकरांनी आणले समोर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत आहेत. असाच प्रकार पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पीडित मुलीसह पत्रकार परिषद घेत हा प्रकार समोर आणला आहे. आमदार पडळकर म्हणाले की, मंचरजवळील एका गावात राहणार्या 16 वर्षीय मुलीचे तिच्या मैत्रिणीच्या भावासोबत ओळख झाली.
मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्या वेळी मुलीच्या घरच्यांनी मुलीला आणि संशयित आरोपी मुलाला समज दिली. त्यानंतर काही दिवसांनी संशयित आरोपी मुलाने पीडित मुलीस फूस लावून पळवून नेले. ही घटना चार वर्षांपूर्वी घडली असून, संशयित मुलगा हा गेल्या सहा महिन्यांपासून गावात राहत असल्याची माहिती मुलीच्या घरच्यांना मिळाली. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली. परंतु, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.
घरचे आणि गावातील काही कार्यकर्त्यांनी संशयिताकडे कसून विचारपूस केली. त्या वेळी संशयिताच्या बंद असलेल्या घराची झाडाझडती घेतली असता, त्या घरातून मुलगी आढळून आली. मुलीला पालकांच्या ताब्यात देऊन आरोपीला पोलिसात देण्यात आले. चार वर्षांपूर्वी संशयिताविरोधात तक्रार देण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी योग्य तपास केला नाही, असा आरोप या वेळी आमदार पडळकर आणि मुलीच्या चुलत भावाने केला आहे.
चार वर्षांत पीडितेला बुरखा घालण्यास सांगितले असून, बीफ खाऊ घातले. तिला नमाजपठण करण्यासही भाग पाडले. तिच्या हाताला आणि पोटाला सिगारेटचे चटके देण्यात आले. पीडित मुलीला कधीही घराच्या बाहेर येऊ दिले नाही, असा आरोप आमदार पडळकर यांनी केला आहे.
मुलगी पालकांच्या ताब्यात आल्यानंतर तिची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आजही ती बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. तिचे योग्यप्रकारे समुपदेशन होण्याची आवश्यकता आहे. तसेच आता आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात असून, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. तसेच आरोपीचे आई-वडील, बहीण आणि मुलीला गोळ्या देणार्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
खा. सुळे, आ. वळसे पाटलांना टोले
राज्याचे गृहमंत्रिपद भूषविलेल्यांच्या तालुक्यात हा प्रकार घडला आहे. किमान त्यांनी तरी भूमिका मांडावी, अशी शब्दांत नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आमदार पडळकर यांनी टोला लगावला. तसेच राज्यात लव्ह जिहादच्या घटना घडल्या नाहीत. मला लव्ह जिहाद माहिती नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते. असे म्हणणार्यांनी आता पीडित तरुणी आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घ्याव्यात, असे पडळकर म्हणाले.