पुण्यातील गुरुवारच्या पाणीबंदीचा शुक्रवारीही परिणाम | पुढारी

पुण्यातील गुरुवारच्या पाणीबंदीचा शुक्रवारीही परिणाम

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद ठेवल्यानंतर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने मात्र दरवेळीच्या तुलनेत अत्यल्प तक्रारी आल्याचा व तक्रारी आलेल्या भागात टँकरने पाणीपुरवठा केल्याचा दावा केला आहे.

पाऊस लांबण्याच्या शक्यतेमुळे धरणातील पाणीसाठा 31 ऑगस्टपर्यंत पुरविण्यासाठी महापालिकेने दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वडगाव जलकेंद्राच्या अखत्यारीत येणार्‍या भागाचा पाणीपुरवठा रोटेशनप्रमाणे बंद ठेवला जातो. गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर शुक्रवारी रास्ता पेठ, गणेश पेठ, कोंढवा, मुंढवा, औंध, बाणेर-बालेवाडी परिसरातून पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी करण्यात आल्या.

तरी बाणेर-बालेवाडी परिसर, आपटे रस्ता, कॅम्पचा काही भाग, तसेच नाना पेठ, भवानी पेठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, दत्तवाडी परिसर, कोंढवा-मुंढवा आदी परिसरात पाण्याविषयी कमी-अधिक स्वरूपाच्या तक्रारी पालिकेकडे आल्या. बहुतांश भागात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला.

नेहमी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यास जलवाहिनीत हवा साठून दुसर्‍या दिवशीचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. हा पूर्वानुभव लक्षात घेऊन या वेळी विशेष नियोजन करण्यात आले होते. 20 ठिकाणी गेल्या आठवड्यातच एअर व्हॉल्व्ह बसविण्यात आले. तसेच यंदाही जलकेंद्रांच्या टाक्या नेहमीपेक्षा दोन तास आधीच भरण्यात आल्या. त्यामुळे शुक्रवारी तक्रारींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

Back to top button