पिंपरी महापालिका नोकर भरतीसाठी आजपासून परीक्षा, निरीक्षक म्हणून पालिकेचे 98 अधिकारी राज्यभरात रवाना | पुढारी

पिंपरी महापालिका नोकर भरतीसाठी आजपासून परीक्षा, निरीक्षक म्हणून पालिकेचे 98 अधिकारी राज्यभरात रवाना

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध 388 पदांच्या नोकर भरतीसाठी शुक्रवार (दि.26) ते रविवार (दि.28) असे तीन सत्रात ऑनलाइन परीक्षा होणार आहे. परीक्षेला 85 हजार 771 पैकी 70 हजार उमेदवार बसण्याची शक्यता आहे. राज्यभरातील 98 परीक्षा केंद्रांवर निरीक्षक म्हणून काम पाहण्यासाठी पालिकेचे 98 अधिकारी गुरूवारी (दि.25) रवाना झाले आहेत.

अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अ‍ॅनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) या 15 पदांसाठी एकूण 388 जागांसाठी ही भरती आहे.

त्यासाठी टीसीएस या खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. त्यासाठी राज्यभरातील 26 शहरातील 98 परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. एका उमेदवारासाठी पालिका टीसीएमला 570 रुपये शुल्क अदा करणार आहे. परीक्षा ऑनलाइन माध्यमातून होणार असून, पर्यायी उत्तर स्वरूपाचे विषयांनुसार एकूण 200 गुणांचे प्रश्नपत्रिका असणार आहे. या परीक्षेसाठी पालिकेचे कर्मचार्‍यांनीही अर्ज भरले आहेत.

परीक्षा केंद्रांवर पालिकेचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमले आहेत. ते गुरुवारी आपआपल्या केंद्राकडे रवाना झाले आहेत. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर बसविण्यात आले आहेत. केंद्रावरील कॉपी व इतर गैरप्रकार रोखण्यासाठी फ्रॅक्सिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, स्कॅनरची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिव्यांग उमेदवारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

परीक्षा झाल्यानंतर सर्वांधिक गुण असलेल्या उमेदवारांची तसेच, प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ती यादी पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. अस्सल कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर उमेदवाराचे मेडिकल व पोलिस व्हेरिफिकेशन केले जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना नोकरीवर रूजू करून घेतले जाणार आहे.

ऑनलाईन परीक्षेची तयारी पूर्ण

महापालिका नोकरभरतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उद्या शुक्रवारपासून प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होणार आहे. ती रविवारपर्यंत विविध सत्रांत सुरू राहणार आहे. राज्यातील 98 परीक्षा केंद्रासाठी पालिकेचे अधिकारी निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहेत. ते अधिकारी नेमलेल्या ठिकाणी रवाना झाले आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर टीसीएसचे अधिकारी व कर्मचार्‍यांसह तांत्रिक अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांचेही सहकार्य घेण्यात आले आहे. तसेच, पालिका भवनात संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

Back to top button