उंडवडी : ऊन, वारा, पाऊस याचा होणार वारकर्‍यांना त्रास | पुढारी

उंडवडी : ऊन, वारा, पाऊस याचा होणार वारकर्‍यांना त्रास

युवराज इंदलकर

उंडवडी(पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा दि. 17 जूनला उंडवडी सुपे येथे मुक्कामी येणार असून, वारकर्‍यांच्या सोईसाठी प्रशासन तसेच स्थानिक पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे. पाटस ते उंडवडी सुपे या पालखी महामार्गाच्या दुतर्फा पूर्वी वड, पिंपळ, बाभळ, चिंच, लिंब, बदाम अशी अनेक प्रकारची झाडे होती. याचा वारकर्‍यांना विसाव्यासाठी उपयोग होत असे. शिवाय ऊन, वारा, पाऊस यापासूनही बचाव होत असे. परंतु, पालखी महामार्गाच्या कामामुळे रस्त्याकडील सर्व झाडे तोडल्याने वारकर्‍यांना आता ऊन, वारा, पावसाचा सामना करावा लागणार आहे.

पाटस ते उंडवडी सुपे या पालखी महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीसाठी रस्ता सोईस्कर झाला आहे. पूर्वी हा रस्ता दोनपदरी होता. आता पालखी महामार्गाचे काम सहापदरी झाल्याने वाहतुकीसाठी रस्ता सोईस्कर झाला असला तरी रोटी, हिंगणीगाडा, वासुंदे, खराडेवाडी, उंडवडी सुपे, उंडवडी क.प. या गावांत उड्डाणपूल झाल्याने गावचा संपर्क जवळपास तुटल्यासारखा झाला असून, याचा वारकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे. पालखी महामार्गामुळे वारकर्‍यांना पायी चालणे जरी सोपे झाले असले, तरी झाडे तुटली व गावे पुलाखाली गेल्याने आपण कोणत्या ठिकाणी आलो तसेच कोठे विसावा करायचा, याचा सामना करावा लागणार, हे निश्चित.

वारकर्‍यांना थोडावेळ विश्रांती घेता येईल, याबाबत सध्या काहीच प्रयोजन झालेले नाही. परंतु, आगामी बैठकीमध्ये याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.

                                                        – गणेश शिंदे,
                                                 तहसीलदार, बारामती

Back to top button