बेलवडी ते जंक्शनमधील 150 वर्षांची झाडे तोडली; वारकर्यांना बसणार उन्हाचा चटका

हरिदास वाघमोडे
जंक्शन(पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. पालखी महामार्गाचे काम सुरू असताना गेल्या दोन वर्षांत बेलवडी ते जंक्शन यादरम्यानची मोठमोठी 150 वर्षांपूर्वीची झाडे तोडण्यात आली. त्यामुळे वारी सोहळ्यावेळी वारकर्यांना असह्य उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या पालखी महामार्गाचे काम जोरदार सुरू आहे. रस्त्यालगत असणारी जुनी दीडशे वर्षांपूर्वीची वड, पिंपळ, चिंच, कवठ, उंबर, लिंबाची झाडे तोडण्यात आली. काहींचे पुनर्रोपण करण्यात आले.
त्यापैकी काही झाडांना नवीन पालवी आली आहे, तर काही झाडे जळून गेली आहेत. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला झाडे लावण्यात आली आहेत. ती झाडे मोठी होण्यास सुमारे 10 वर्षांचा कालावधी जाणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या वारीवेळी वारकरी दुपारी झाडाच्या सावलीखाली विसावा घेत होते. मात्र, 150 वर्षांपूर्वीची झाडे तोडण्यात आल्यामुळे या वर्षी झाडांविना पालखी सोहळा होणार आहे.
पालखी सोहळ्यावेळी शासनाने ठिकठिकाणी तात्पुरती विसावा केंद्रे सुरू करावीत तसेच स्थानिक ग्रामपंचायत, विविध सेवाभावी संस्था तसेच नागरिकांनी देखील वारकर्यांसाठी विसाव्याची व्यवस्था करावी. महामार्गाचे इंदापूर तालुक्यात बर्याच ठिकाणी अपूर्ण काम आहे. लासुर्णे येथील काम दीड वर्षांपासून बंद आहे. गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण कामामुळे स्थानिक नागरिक व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.