पालखीमार्ग झाला सुना सुना ! पाटस-बारामती पालखीमार्गावरील सावली गायब

अक्षय देवडे
पाटस (पुणे) : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात दोन्ही बाजूंना असलेली सर्वच झाडे तोडल्याने या महामार्गावर सावलीचा आधार राहिलेला नाही. त्यामुळे यंदा वारकर्यांना कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे. तसेच विसाव्यालादेखील झाडे नसल्याने वारकर्यांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने जागोजागी सावलीची व्यवस्था करावी, अशी मागणी वारकर्यांकडून होऊ लागली आहे.
चौपदरीकरणासाठी पाटस-बारामतीदरम्यानच्या पालखीमार्गावरील सर्वच झाडांची पूर्णपणे कत्तल झाली आहे. याच मार्गाने संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना अनेक वारकरी दुपारच्या वेळी विसाव्यासाठी तसेच जेवणासाठी झाडांचा आधार घेतात. मात्र, यंदा रखरखीत उन्हात विश्रांतीसाठी सावलीचा एक लहानसा भागही शिल्लक राहिलेला दिसत नाही.
या मार्गावरील डोंगरमाथ्याचा प्रवास करतानाही विसाव्यासाठी वारकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. अनेकदा हलकासा पाऊस आल्यास वारकरी झाडांचा आधार घेतात. मात्र झाडेच नसल्याने वारकर्यांना पावसात भिजण्याची वेळ येणार आहे. यामुळे वारकर्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने पालखी सोहळ्यासाठी जागोजागी मंडप व सावलीसाठी राहुट्या उभाराव्यात, अशी मागणी वारकर्यांकडून केली जात आहे.
रोटी घाटातील नेकलेस दृश्य नाहीसे
दरवर्षी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पाटस (ता. दौंड) येथील रोटी घाटातून जातानाचे नेकलेस दृश्य यापुढे भाविकांना पाहता येणार नाही. कारण सन 2018 मध्ये श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या चौपदरीकरणात रोटी घाटातील नेकलेसचा आकार असलेली वळणे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे हे दृश्य कायमचेच नाहीसे झाले आहे.