पुणे : अखेर गदिमा स्मारकाच्या कामास मुहूर्त | पुढारी

पुणे : अखेर गदिमा स्मारकाच्या कामास मुहूर्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला दोन वर्षे उलटल्यानंतर पुणे महापालिकेला अखेर स्मारकाच्या कामाची सुरवात करण्याची आठवण झाली आहे. शनिवारी (दि. 27) पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अखेर स्मारकाच्या कामाला मुहूर्त लागणार आहे. सायंकाळी 5 वाजता महात्मा सोसायटीजवळ (कोथरूड) स्मारकाच्या ठिकाणी कामाला सुरुवात होणार आहे.
 उशिरा का होईना स्मारकाच्या कामाला गती मिळणार असल्याने माडगूळकर कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे, आतातरी स्मारकाचे काम गतीने व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांपासून गदिमा स्मारकाचा प्रश्न सातत्याने चर्चिला जात आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जानेवारी 2023 रोजी रखडलेल्या गदिमा स्मारकाच्या जागेस भेट दिली होती व वर्षभराच्या आत स्मारक पूर्ण करावे, असे आदेश दिले होते.
त्यानंतर महापालिकेमार्फत स्मारकासाठी वेगळी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. नुकतीच ती प्रक्रिया पूर्ण होऊन वर्क ऑर्डर दिली असून, आता स्मारकाच्या कामाला खर्‍या अर्थाने सुरुवात होणार आहे. शनिवारी (दि. 27) स्मारकाच्या कामाला चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात होणार असल्याची माहिती पालिकेच्या भवन विभागाकडून देण्यात आली.
  • प्रस्तावित गदिमा स्मारक – महात्मा सोसायटी जवळ, कोथरूड
  • स्मारकात काय असणार ः गीतरामायण दालन, साहित्य दालन, गदिमांच्या वैयक्तिक वस्तूंचे दालन, राजकारण दालन, चित्रपट दालन, डिजिटल दालन, वाचनालय आणि अ‍ॅम्फी थिएटर
  • विविध दालनांमध्ये वैयक्तिक छायाचित्रे, गीतरामायणातले प्रसंग, गदिमांच्या आयुष्यातील निवडक प्रसंग साकारले जातील. कविता, गीतांच्या आणि  गीतरामायणाच्या म्युरल, गाणी – चित्रपट पाहण्यासाठी, गदिमांची भाषणे यांच्यासाठी ई- दालन, त्यांचे साहित्य, पुस्तके येथे उपलब्ध असतील.
22 मार्च 2021 रोजी तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ आणि माडगूळकर कुटुंबीयांच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, त्यानंतर कामात काहीच प्रगती झाली नव्हती. पिंपरी- चिंचवड येथील गदिमा नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्यानिमित्ताने चंद्रकांत पाटील यांच्याशी स्मारकाच्या कामाबाबत चर्चा झाली होती आणि त्यांना स्मारकाचे काम पुढे नेण्याविषयी विनंती केली होती. त्यानंतर स्मारकाच्या कामाला अखेर सुरुवात होत आहे.
                                                                       – सुमित्र माडगूळकर, गदिमांचे नातू

Back to top button