पिंपरी : चिखली खूनप्रकरणातील आरोपीला सातार्‍यातून अटक | पुढारी

पिंपरी : चिखली खूनप्रकरणातील आरोपीला सातार्‍यातून अटक

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादातून एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी चिखली येथे घडली. या प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. सौरभ ऊर्फ सोन्या बाळासाहेब पानसरे (23, रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड. मूळ रा. कासारमळा, पानसरेवाडी, सुपा, ता. बारामती, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, एका अल्पवयीन साथीदारालादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कृष्णा ऊर्फ सोन्या तापकीर (वय 20), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चिखलीगाव येथे कृष्णा ऊर्फ सोन्या तापकीर या तरुणाचा खून झाला. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरदिवसा गोळीबार करून ही हत्या केली. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट एकला या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याबाबत आदेश देण्यात आले होते.

पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी दोन पथके तयार केली. या पथकांनी चिखली, पुनावळे, मोईगाव, यवत, सुपा या भागात आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी पानसरे हा सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील सरताळा या गावामध्ये लपून बसला आहे. त्यानुसार, पोलिसांनी सरताळा येथील एका कॅनललगत सापळा लावून आरोपीसह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक इमरान शेख, पोलिस अंमलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव जावळे, सोमनाथ बोर्‍हाडे, फारूक मुल्ला यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button