हर्षचा मृतदेह अधिक काळ रुग्णालयात पडून; वैद्यकीय अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस | पुढारी

हर्षचा मृतदेह अधिक काळ रुग्णालयात पडून; वैद्यकीय अधिकार्‍यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस

उरुळी कांचन(ता. हवेली); पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन येथील हर्ष जगताप या 20 महिन्यांच्या बाळाच्या मृत्यूनंतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल तीन तास मृतदेहाचे शवविच्छेदन न करणार्‍या तीन दोषी वैद्यकीय अधिकार्‍यांना जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी ’कारणे दाखवा’ नोटीस बजावली. या नोटीसवर ग्रामस्थांचे समाधान झाले नसून, या वैद्यकीय अधिकार्‍यांची तातडीने चौकशी होऊन निलंबन करण्याची करण्याची मागणी आक्रमकपणे होऊ लागली आहे.

उरुळी कांचन येथील एका इमारतीच्या पाण्याची टाकीत बुडून हर्ष जगताप याचा मंगळवारी (दि. 23) सायंकाळी मृत्यू झाला होता. हर्षच्या नातेवाइकांनी हर्षला उरुळी कांचन येथील प्राथमिक रुग्णालयात नेले. मात्र, त्या ठिकाणी एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने, हर्षचा मृतदेह तीन तासांहून अधिक काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून होता. या तीन तासांच्या काळात अनेकांनी डॉक्टरांना फोन करूनही, तीनपैकी एकाही डॉक्टरांनी फोन न उचलल्याने हर्ष जगताप याच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यानंतर पत्रकार व ग्रामस्थांनी या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची आक्रमक मागणी केली आहे.

त्यानंतर गुरुवारी (दि. 25) जिल्हा परिषद प्रशासनाने झालेल्या या गंभीर प्रकाराची दखल घेऊन उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वरील तीन वैद्यकीय अधिकार्‍यांना ’कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. दरम्यान हा घटनाक्रम घडला असताना हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने डॉ. सुचिता कदम, डॉ. संदीप सोनवणे व डॉ. नम्रता नंदे या तिघांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींना या निगरगठ्ठ अधिकार्‍यांनी दाद दिली नसल्याचे विदारक सत्य पुढे आले आहे.

Back to top button