चासकमानचे पाणी 24 नंबर चारीसाठी ठरले मृगजळ ! | पुढारी

चासकमानचे पाणी 24 नंबर चारीसाठी ठरले मृगजळ !

निमोणे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : चासकमान प्रकल्पाचे पाणी हा शिरूर तालुक्याच्या टेल भागातील शेतकर्‍यांसाठी अतिशय जिव्हाळाचा मुद्दा ! मात्र प्रशासकीय बाबूंच्या गलथान कारभारामुळे चा-यांची कामे निकृष्ट झाल्याने बहुतांश चा-यांना पाणीच येत नाही. परिणामी, लंघेवाडी, चव्हाणवाडी, गरुडवस्ती या भागाला चासकमानचे पाणी अक्षरशः मृगजळ ठरले आहे.

या परिसरातील तब्बल साडेतीनशे हेक्टर क्षेत्र याच चारीमुळे ओलिताखाली येऊ शकते. मात्र, मुख्य कालव्यापासून चारी करताना कालवा खोल राहिला आणि चारी मात्र उंचीवर घेतली. परिणामी, चारीला पाणीच येत नाही. परिसरातील शेतकरी चव्हाणवाडीचे सरपंच संतोष लंघे, उपसरपंच वैभव जगदाळे, मगन बांदल यांनी अनेकदा चासकमानच्या अधिका-यांना भेटून पाण्याची मागणी केली. पाणी मिळेल या अपेक्षेने पाणीपट्टी भरली मात्र दाब कमी आहे,आम्ही तरी काय करणार हेच पालुपद ऐकून घ्यावे लागत आहे.

संबंधित विभागाने 24 नंबर चारीचे खोलीकरण केल्यास हा परिसर ओलिताखाली येऊ शकतो. मात्र, प्रशासन अजिबात सहकार्याची भूमिका घेत नसल्यामुळे परिसरातील शेतकरी हक्काच्या पाण्यापासून ऐन टंचाईत वंचित आहेत. चारी खोल केली तर पाणी येईल हे अडाणी शेतकर्‍यांना कळते तेच एसीमध्ये बसलेल्या प्रशासकीय बाबूला का कळत नाही हा प्रश्न आहे. रब्बी हंगामात चासकमानचे पाणी धनदांडग्याच्या मुजोरीवर पाहिजे तिथे जेसीबी लावून पळवले जाते. मात्र, ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीत चा-या खोदल्या त्यांना आर्थिक मोबदलाही नाही आणि पाणीही नाही असा सुलेमानी कारभार करून प्रशासनाला नक्की काय आनंद होतो असा प्रश्न विचारला जात आहे.

आजही परिसर बारमाही कोरडवाहू

आजही हा परिसर बारमाही कोरडवाहू म्हणूनच ओळखला जातो. शेतकर्‍यांना शेतमजूर म्हणून दुस-याच्या शेतावर जावे लागते. फक्त नियोजन आणि थोडी आर्थिक तरतूद केल्यास पाण्याची चातकासारखी वाट पाहणार्‍या या शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तनाची पहाट उगवेल, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत.

Back to top button