बारामतीतील दोघांची आयएएस पदाला गवसणी | पुढारी

बारामतीतील दोघांची आयएएस पदाला गवसणी

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बारामतीतील दोघांनी नेत्रदीपक यश मिळवत अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. येथील प्रतीक अनिल जराड व डॉ. शुभांगी ओंकार पोटे- केकाण यांनी आयएएस पदाला गवसणी घातली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये बारामतीच्या प्रतीक जराड याने देशात 112 वा क्रमांक प्राप्त करीत उज्ज्वल यश संपादन केले. या यशामुळे आता थेट वरिष्ठ अधिकारी बनवण्याचा त्याचा मार्ग खुला झाला आहे.

बारामती येथील म. ए. सो. विद्यालय येथे माध्यमिक, तर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील महाविद्यालयातून त्याने अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. ही पदवी संपादन केल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी त्याने दिल्ली गाठली होती.

दिल्लीला त्याने सलग प्रयत्न करून अखेर या परीक्षेत यश संपादन केले. प्रतीक याचे वडील बारामती येथील आयएसएमटी कंपनीमध्ये क्लर्क असून, आई गृहिणी आहे. इयत्ता दहावीमध्ये त्याला 97 टक्के, तर बारावीमध्ये 92 टक्के गुण प्राप्त झाले होते. सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या प्रतीक याने नियोजनबद्ध रीतीने वाटचाल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न साकारले आहे.

प्रतीक हा देशात 112 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी आल्यानंतर जराड कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. त्यांच्या घरी अभिनंदन करण्यासाठी बारामतीकरांनी मोठी गर्दी केली होती. स्वतः प्रतीक हा परीक्षेनिमित्त दिल्ली येथे आहे. तो येत्या काही दिवसात बारामतीला परतणार असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले.

डॉ. शुभांगी पोटे यांनीही मिळविले यश

येथील डॉ. शुभांगी ओंकार पोटे- केकाण यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यांना देशात 530 वी रँक प्राप्त झाली आहे. शुभांगी या मूळच्या करमाळ्यातील वंजारवाडी येथील असून, त्या सध्या बारामतीत वास्तव्यास आहेत. त्यांचे पती ओंकार पोटे हेदेखील स्पर्धा परीक्षेतूनच बँकेची परिक्षा उत्तीर्ण झाले व सध्या अहमदनगर येथील स्टेट बँकेत ते शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.

शुभांगी यांनी लग्नानंतरही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास अतिशय जिद्दीने सुरू ठेवला होता. घरातच त्यांनी कसून अभ्यास केला. विशेष म्हणजे सासर व माहेर दोन्हीकडून त्यांना सातत्याने प्रोत्साहन मिळाल्याने त्यांनी आयएएस होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. शुभांगी या बीडीएस असून, सध्या त्या बारामतीतील श्रीरामनगर येथे वास्तव्यास आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दंतचिकित्सक म्हणून त्यांनी करमाळा येथेही काम केलेले आहे. लग्नानंतर पती स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून बँक अधिकारी झाल्यानंतर शुभांगी यांनीही कसून सराव केला व त्यांनीही अखेर यश मिळविले. त्यांच्या यशामुळे केकाण व पोटे परिवाराने दिवाळी साजरी केली.

क्लास न लावता यश

शुभांगी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करताना कोणताही क्लास न लावता यश संपादन केले हे वैशिष्ट्य आहे. घरची जबाबदारी सांभाळत त्यांनी अभ्यास केला व आपल्या गुणवत्तेच्या आधारावर थेट आयएएस होण्याचे स्वप्न साकारले.

Back to top button