पळसदेव : पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा उजनीकाठी मुक्काम | पुढारी

पळसदेव : पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचा उजनीकाठी मुक्काम

पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उजनी धरणातील पाणीसाठा प्रचंड वेगाने कमी होऊ लागल्याने शेतकर्‍यांना आपली पिके जगवण्यासाठी व पिकांना वेळेत पाणी देण्यासाठी शेतकर्‍यांना नदीकाठी मुक्काम ठोकावा लागत आहे. यासाठी पाण्यातील गाळ काढून आणि सातत्याने दूषित होत असलेल्या पाण्यात उतरल्याने पाय खाजवून अंगाचे कातडे चालले आहे. उजनी धरणग्रस्त शेतकर्‍यांच्या अशा व्यथा आता तरी कोणाच्या लक्षात येतील का, हा प्रश्न आहे.

राज्यातील गोड्या पाण्याचे 123 टीएमसी पाणीक्षमता असलेले उजनी धरण यावर्षी ओव्हरफ्लो झाले होते. यामुळे उजनीतील पाणी कसे जरी वापरले तरी धरण वजा (मायनस) मध्ये जाईल असे वाटत नव्हते. मात्र, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले आणि सोलापूर भागातील शेतकर्‍यांना तीन पाळ्या वेगवेगळ्या टप्प्यात सोडणे गरजेचे असताना या सरकारने तीन पाळ्या सलग एकाच टप्प्यात म्हणजेच गेली तीन महिन्यांपासून नदी, नाले, कालवे, सीना-माढा बोगदा, डावा-उजवा कालवा असे सातत्याने चालू ठेवले. त्यामुळे आजघडीला उजनी धरणात केवळ वजा 21.65 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मे महिन्यातील उष्णतेचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या वर आहे. यामुळे शेतकर्‍यांची आठवड्याला पाण्याला येणारी पिके आता दोन-चार दिवसाला पाण्याला येत आहेत. त्यात शेतकर्‍यांना 6 ते 8 तास मिळणारी वीज आता केवळ सातत्याने झटके मारून 3 ते 4 तास मिळत आहे. यामुळे शेतकर्‍यांना रात्रपाळीला तर नदीकाठावर तळ ठोकूनच थांबावे लागत आहे.

कधी न उघड्या पडणार्‍या चार्‍या यावेळेस उघड्या पडल्या असून, त्याही बंद पडण्याच्या मार्गावर आल्या आहेत. त्यामुळे येथील धरणग्रस्त शेतकरी दिवसरात्र लाईट येण्यापूर्वी केबल्स, पाइप लाइन, विद्युत पंप वाढवून फुटबॉल पाण्यात घेत आहेत. फुटबॉल पाण्यात घेण्यापूर्वी तासन् तास पाण्यात राहून तेथील गाळ काढावा लागत आहे. तासन्तास पाण्यात थांबल्यामुळे प्रदूषित पाण्यामुळे शेतकर्‍यांच्या अंगाला खाज येत आहेत. परिणामी, खाजवून कातडे जात आहे. शेतकर्‍यांच्या या स्थितीकडेदेखील लक्ष देणे गरजेचे आहे.

Back to top button