बहिणीसाठी त्याने नेपाळहून पुणे गाठले | पुढारी

बहिणीसाठी त्याने नेपाळहून पुणे गाठले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लग्नाच्या आमिषाने नेपाळहून पुण्यात घेऊन आलेल्या एका अल्पवयीन मुलीची गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सुटका केली. संबंधित तरुण मुलीला मारहाण करून लैंगिक अत्याचार करत होता. तसेच दिवसभर तिला खोलीत डांबून ठेवून त्रास देत होता. तिच्या भावाने एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क केल्यानंतर तिला सुखरूप त्याच्या ताब्यात देण्यात आले.

याप्रकरणी, येरवडा पोलिसांनी मोहम्मद रफिक शेख (वय 23, रा. येरवडा, मूळ रा. नेपाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद हा नेपाळ येथून 17 वर्षीय पीडित अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात खेचून लग्नाच्या आमिषाने पुण्यात घेऊन आला होता. तीदेखील त्याच्यावर विश्वास ठेवून घरच्यांना न सांगता पळून आली होती.

काही दिवस प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर मोहम्मद हा तिला मारहाण करून लैंगिक अत्याचार करू लागला. तसेच तो तिला कोणाशी बोलू देत नव्हता. मोहम्मद हा बिगारी काम करतो. तो कामावर जाताना पीडित मुलीला खोलीत कोंडून जात होता. त्रास असह्य झाल्यामुळे पीडितेने एकेदिवशी मोहम्मद याला न सांगता त्याचा मोबाईल घेऊन नेपाळ येथील आपल्या भावाला आपबिती सांगितली.

तसेच तिला ठेवलेल्या खोलीचे वर्णन सांगितले. तिच्या भावाने हडपसर येथील एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला ही माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अश्विनी पाटील यांना मुलीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू…

तांत्रिक विश्लेषणद्वारे पीडिता येरवडा येथील गोल्फ क्लब चौक परिसरात असल्याचे समोर आले. मात्र, एक किलोमीटरच्या अंतरात तिचा शोध घेणे अवघड होते. तिने खोलीचे वर्णन भावाला सांगितले होते. पोलिसांनी त्या वर्णनाची खोली शोधून काढली. त्याच वेळी तिने जाळीतून हात उंचावून पोलिस व भावाला खुणावले.

त्यानंतर पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून भावाच्या ताब्यात दिले. बहिणीला पाहून भावाच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते. त्याने पोलिसांचे आभार मानले. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Back to top button