

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमण कारवाईत केलेल्या दबंगगिरीचे प्रकरण अखेर उपायुक्त माधव जगताप यांना भोवले आहे. त्यांच्याकडील अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचा अर्धा पदभार तसेच पर्यावरण विभागाचा पदभारही काढून घेण्यात आला आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी यासंबंधीचे कारवाईचे आदेश दिले आहेत.
अतिक्रमण उपायुक्त असलेल्या जगताप यांचा फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमण कारवाईदरम्यान एका स्टॉलला लाथ मारतानाचा व्हिडिओ गतआठवड्यात व्हायरल झाला होता. त्यांच्या या अशा कृतीवरून प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेकांनी जगताप यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार आयुक्तांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर आता आयुक्तांनी कारवाई करत त्यांच्याकडे अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचा शहराचा अर्धाच कार्यभार ठेवला आहे. उर्वरित अर्ध्या शहराची जबाबदारी महापालिकेत नव्याने शासनाकडून प्रतिनियुक्त करण्यात आलेले उपायुक्त राजू नंदकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
त्यांच्याकडे परिमंडळ-1 च्या येरवडा-कळस-धानोरी, नगररस्ता-वडगावशेरी आणि ढोले पाटील रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि परिमंडळ-2 च्या औंध, घोले रस्ता-शिवाजीनगर आणि कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमणांची जबाबदारी नंदकर यांच्याकडे असणार आहे. तीन परिमंडळाची जबाबदारी माधव जगताप यांच्याकडे असणार आहे. तर जगताप यांच्याकडील पर्यावरण विभागाचा तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, तांत्रिक विभाग तसेच मोटार वाहन विभागाची जबाबदारी नंदकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अतिक्रमण विभागाचे विभाजन करून त्यावर दोन उपायुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिक्रमण कारवाईत राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे ही जबाबदारी शासनाच्या अधिकार्याकडे देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. अखेर आयुक्तांनी आता अतिक्रमणची जबाबदारी शासननियुक्त अधिकार्याकडे सोपविली आहे.