पुण्यातील सात अतिधोकादायक वाडे उतरविले | पुढारी

पुण्यातील सात अतिधोकादायक वाडे उतरविले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पेठांमधील वाड्यांचे महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू असून, जानेवारीपासून पन्नास टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आत्तापर्यंत केलेल्या सर्वेक्षणात एकूण 34 अतिधोकादायक वाडे आढळल्याने नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. त्यातील 7 धोकादायक वाडे उतरविण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकार्‍यांनी दिली आहे.

पावसाळ्यात धोकादायक वाडेकोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिका दरवर्षी पेठांमधील वाड्यांचा सर्वे करून धोकादायक, अतिधोकादायक आणि डागडुजी करून दुरुस्त होणार्‍या वाड्यांची वर्गवारी करते. यामध्ये या वाड्यांना नोटीस बजावून वाड्यांची दुरुस्ती करण्याच्या किंवा वाडे उतरण्याच्या सूचना केल्या जातात. रहिवाशांनी स्वतःहून अतिधोकादायक वाडे उतरवून घेतले नाहीत, तर महापालिकेकडून असे वाडे उतरविले जातात.

महापालिकेने पेठांमधील वाड्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी टेक ब्युरो इंजि. प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती केली आहे. या संस्थेची चार ते पाच पथके सर्वेक्षण करण्याचे काम करीत आहेत. या संस्थेने जानेवारीपासून पेठांमधील साधारण तीन हजार वाड्यांपैकी दीड हजार वाड्यांचे सर्वेक्षण केले आहे. यामध्ये 34 वाडे अतिधोकादायक आढळले आहेत. या धोकादायक वाड्यांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून, त्यातील सात वाडे उतरविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंते युवराज देशमुख यांनी सांगितले.

धोकादायक वाडे ः शहरातील कसबा पेठ, शुक्रवार पेठ, रविवार पेठ, सदाशिव आणि नवी पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ, नाना पेठ, गणेश पेठ आशा विविध पेठांमध्ये चौरसाकृती आणि आयताकृती आकाराचे शेकडो वाडे आहेत. यातील अनेक वाडे शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अनेकवेळा वाडे पडतात, त्यांमध्ये अनेकवेळा मनुष्यहाणीही होते.

धोकादायक वाड्यांची 4 भागांत विभागणी

सी-1 : राहण्यास योग्य नसणे आणि तो तत्काळ उतरविणे
सी-2 ए : वाडा रिकामा करून संरचनात्मक दुरुस्ती करणे
सी-2 बी : वाडा रिकामा न करता त्याची संरचनात्मक दुरुस्ती करणे
सी-3 : वाड्याची किरकोळ दुरुस्ती करणे

Back to top button