पुणे: पावसाचे पाणी विहिरी-खाणींमध्ये अडविणार, महापालिका आयुक्तांकडून कामांचा आढावा | पुढारी

पुणे: पावसाचे पाणी विहिरी-खाणींमध्ये अडविणार, महापालिका आयुक्तांकडून कामांचा आढावा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी फर्ग्युसन मागील टेकडीवरून वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावर येण्यापूर्वी कॉलेजच्या आवारातील विहिरींमध्ये आणि खाणीमध्ये अडविण्याचे नियोजन करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी अधिकार्‍यांना केल्या आहेत.

महापालिका आयुक्त विक्रम कुमार मागील काही दिवसांपासून अधिकार्‍यांसोबत पावसाळापूर्व कामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करीत आहेत. त्यांनी सोमवारी फर्ग्युसन रस्ता, त्यामागील टेकडी, तसेच जंगली महाराज रस्त्यावर पाणी साठणार्‍या ठिकाणांची पाहणी केली. फर्ग्युसनमागील टेकडीवरून वाहत येणारे पाणी थेट रस्त्यावर येण्यापूर्वी कॉलेजच्या आवारातील विहिरींमध्ये येईल, अशी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने त्यांनी उपाययोजना सुचविल्या. सध्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या खाणींमधील गाळ काढून पाणी साठवण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. अशा सूचना दिल्या आहेत.

चेंबर्स वाढविण्याची सूचना

जंगली महाराज रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिर येथील मेट्रोच्या कामामुळे, तसेच पदपथामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा येत असल्याने मागील तीन वर्षांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. याठिकाणी आणखी चेंबर्स वाढवून नवीन वाहिनी टाकण्याची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा अल्प काळासाठीची असून पावसाळ्यापूर्वी हे काम करून घेण्याचे प्रयत्न असल्याचेही खेमनार यांनी नमूद केले.

कामे टाळल्यास कारणे दाखवा

पावसाळापूर्व कामांचे वेळापत्रकानुसार नियोजन करण्यात मागे पडलेले उपायुक्त आणि सहायक आयुक्तांनादेखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पावसाळापूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी, तसेच पावसाळ्यातही देखरेखीसाठी क्रॉनीक स्पॉटच्या परिसरात अतिरिक्त अधिकारी नेमण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्याचे खेमनार यांनी सांगितले.

Back to top button