पिंपरी: समाजात प्रतिष्ठा वाढू लागल्याने ‘त्या’ तरुणाचा खून | पुढारी

पिंपरी: समाजात प्रतिष्ठा वाढू लागल्याने ‘त्या’ तरुणाचा खून

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: चिखली येथील चौकात भरदिवसा तरुणाचा गोळ्या घालून खून करण्यात आला. सोमवारी (दि. 22) दुपारी ही घटना घडली. समाजात प्रतिष्ठा वाढू लागल्याने मित्रांनीच तरुणाचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. कृष्णा ऊर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (21, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (38, रा. चांदूस, ता. खेड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सौरभ ऊर्फ सोन्या पानसरे, सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी नवरात्र उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर, चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात कृष्णा आणि आरोपी यांचे भांडण झाले होते. त्यानंतर कृष्णा याची चिखली परिसरात प्रतिष्ठा वाढू लागली होती. याचा राग मनात धरून आरोपींनी कट रचून कृष्णा याला ठार मारण्याचा कट आखला. दरम्यान, सोमवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास कृष्णा याच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कृष्णा याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Back to top button