मंचर : कळंब येथे यात्रेनिमित्त 480 बैलगाडे धावले | पुढारी

मंचर : कळंब येथे यात्रेनिमित्त 480 बैलगाडे धावले

मंचर; पुढारी वृत्तसेवा : कळंब (ता.आंबेगाव) येथील श्री मुंजोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त 480 बैलगाडे धावले. ग्रामस्थ कळंब, परिसरातील दानशूर उद्योजकांकडून यात्रोत्सवानिमित्त 4 दुचाकी, 3 एलईडी यांच्यासह रोख 2 लाख 25 हजार रुपयांची बक्षिसे ठेवली होती, असे सरपंच उषा कानडे आणि माजी सरपंच राजश्री भालेराव यांनी सांगितले.

आजी माजी सरपंच, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, दानशूर उद्योजक, तरुण, शेतकरी आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत कळंब घाटांचे भूमिपूजन आणि बैलगाडा शर्यतीचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात्रोत्सवादरम्यान बाळासाहेब टेमगिरे हवेली यांचा गाडा घाटाचा राजा ठरला. शौर्य दंडवते यांच्या गाड्याला आकर्षक बारी म्हणून इनाम देण्यात आला.

प्रथम क्रमांकात 80 आणि द्वितीय क्रमांकात 123 बैलगाडे धावले. कळंबमध्ये शिस्तबद्ध बैलगाड्याचे दर्शन घडल्याचा उल्लेख दोन दिवसांपूर्वी खेड तालुक्यातील घाटात अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष रामकृष्ण टाकळकर यांनी केला. गेल्या तीन दिवसात कळंबला शिस्तबद्ध बैलगाडे आणि काटा नियोजन कळंब ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. कळंब घाटात आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक आणि ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव आणि द्राक्ष बागायतदार सचिन कानडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, तरुण उद्योजक आणि शेतक-यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

बैलगाडा शर्यती फायनलमध्ये 96 बैलगाडा संघटना, मयूर टेमगिरे, बाळासाहेब साकोरे, सुनील वाणी, रवींद्र थोरात (गुरुजी), विजय थोरात, रवींद्र टेमकर यांनी बक्षीसे मिळवली. साहेबराव आढळराव, लक्ष्मण बांगर यांनी समालोचनाचे काम पाहिले. वेळ सांगण्याचे काम नितीन थिगळे आणि शेखर भालेराव यांनी पाहिले. निशाण बजावण्याचे काम पोपट पानसरे यांनी केले.

Back to top button