पुणे : वेल्हे पोलिस ठाण्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत | पुढारी

पुणे : वेल्हे पोलिस ठाण्याची इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वेल्हे पोलिस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, काम पूर्ण होऊन एक महिना झाला तरी इमारतीच्या उद्घाटनासाठी प्रशासनास मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे भाडोत्री इमारतीतच सुरू असलेला पोलिसांचा कारभार ’जैसे थे’ आहे. तब्बल 2 कोटी 84 लाख रुपये खर्च करून वेल्हे येथील पोलिस वसाहतीजवळील शासकीय जागेवर नवीन इमारत उभारण्यात आली आहे.

बांधकाम पूर्ण होऊन अंतर्गत सजावट, रंगरंगोटीचे कामही पूर्ण झाले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार होते. त्यासाठी पोलिस प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली होती. मात्र, उद्घाटनाला मुहूर्तच मिळाला नाही. त्यामुळे मे महिना संपत आला तरी नवीन इमारतीत पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू झाले नाही.

खासगी इमारतीत पोलिस ठाणे

ब्रिटिश राजवटीपासून वेल्हे तहसील कार्यालय आवारातील इमारतीत वेल्हे पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू होते. मात्र ही इमारत अपुरी पडत असल्याने तसेच मोडकळीस आल्याने एका खासगी इमारतीत 2016 पासून पोलिस ठाण्याचे कामकाज सुरू आहे.

प्रदीर्घ काळ अडथळ्यांना तोंड

वेल्हे पोलिस ठाण्याला स्वतःची इमारत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांपासून वरिष्ठ अधिकारी सातत्याने पाठपुरावा करत होते. दोन वर्षांपूर्वी प्रत्यक्ष जागा ताब्यात मिळाली. त्यानंतर इमारतीचे काम सुरू झाले. जागेचा ताबा घेण्यासाठी तसेच निधी मिळण्यासाठी प्रदीर्घ काळ पोलिस प्रशासनाला अडथळ्यांना तोंड द्यावे लागले.

कामांत सुसूत्रता येणार

वेल्हे तालुक्यातील 129 गावांसाठी वेल्हे पोलिस ठाणे आहे. तालुक्याची लोकसंख्या जेमतेम 56 हजार इतकी आहे. मात्र, भौगोलिक क्षेत्र सिंहगडाच्या पश्चिमेपासून रायगड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत पसरले आहे. स्वतःच्या मालकीची सुसज्ज इमारत मिळाल्याने वेल्हे पोलिसांना कामकाज करणे सोयीचे होणार आहे. तसेच प्रशासकीय कामांत सुसूत्रताही येणार आहे.

Back to top button