पुणेकरांनो सावधान…! भाजीविक्रेत्यांकडून मापात पाप; ग्राहकांची होतेय मोठी फसवणूक | पुढारी

पुणेकरांनो सावधान...! भाजीविक्रेत्यांकडून मापात पाप; ग्राहकांची होतेय मोठी फसवणूक

नवी सांगवी(पुणे) : सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात छोट्या टेम्पोतून भोंगे लावून गल्लोगल्लीत भाजी विक्रीचा व्यवसाय सध्या जोरात सुरू आहे. मात्र, या विक्रेत्यांकडून मापात गोलमाल करून ग्राहकांची मोठी फसवणूक केली जात असल्याचा प्रकार नवी सांगवीत समोर येत आहे. अशा मापात पाप करणार्‍या विक्रेत्यांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वजन काट्याला लावले जाते लोहचुंबक

अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यामार्फत जुन्या वजन काट्यांऐवजी डिजिटल वजन काटे वापरण्याच्या सूचना प्रशासनाकडून यापूर्वी वारंवार देण्यात आलेल्या आहेत. डिजिटल वजन काटेही योग्य वजन दाखवतात का ? ते तपासण्याच्या ही सूचना प्रशासनाकडून विक्रेत्यांना करण्यात आलेल्या आहेत. मात्र, डिजिटल वजन काटे वापरणे तर सोडाच साधे वजन काटेही जुन्या पद्धतीने सर्रासपणे वापरले जात आहेत. या वजन काट्यांवर वजनाऐवजी दगड मांडणे, एखादी वस्तू मांडणे असे प्रकार सुरू आहेत. काही ठिकाणी त्याला लोहचुंबक लावून वजन काट्याच्या मापातच पाप केले जात आहे.

नागरिकांची कारवाईची मागणी

असाच एक प्रकार नवी सांगवीतील साई चौक ते फेमस चौक दरम्यान फिरत्या टेम्पो चालकाकडून केल्याचा पाहायला मिळाला. यामध्ये त्याने वजन काट्याखाली ठेवलेले चुंबक ग्राहकाच्या निदर्शनास आले. त्यावर विचारणा करताच संबंधित कांदा विक्रेत्याने उडवा उडवीचे उत्तरे देत असा गैरप्रकार करत नसल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात खातरजमा केली असता वजन काट्यात आतमध्ये चुंबक लावून हेराफेरी होत असल्याची बाब समोर आली. प्रत्येक सोसायटीत, भाजी मंडई, दुकानात तक्रार करण्यासाठी संपर्क क्रमांक, वेबसाईट उपलब्ध असावी, अशी ग्राहकांकडून केली जात आहे.

Back to top button