पुणे शहरातील उंचावरच्या दिव्यांना प्रकाशाचे वावडे!

पुणे शहरातील उंचावरच्या दिव्यांना प्रकाशाचे वावडे!
Published on
Updated on

समीर सय्यद

पुणे : शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या शिवाजी रस्त्यावरील अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून, काही ठिकाणी दिव्याखाली अंधार आहे, तर दोन मुख्य चौकांतील हायमास्ट दिवे बंद असल्याने रस्त्यावर रात्री अंधार पसरत आहे. शनिवारवाडा ते स्वारगेट या मार्गावर चुकीच्या पद्धतीने पथदिवे बसविण्यात आल्याने अनेक ठिकाणी पथदिव्यांखालीच अंधार असल्याचे दिसत आहे.

शनिवारवाड्यालगत कलाकुसर असलेले पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही, तर रस्त्याच्या डाव्या बाजूने पथदिवेच नसल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी असलेल्या दिव्यांचे खांब उंच असल्याने त्याचा प्रकाश रस्त्यावर पडत नाही. थोडे पुढे आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपतीमुळे रस्ता प्रकाशमय झालेला आहे. या ठिकाणीही कलाकुसर असलेले दिवे सुरू आहेत. त्याचाही पादचार्‍यांना आणि वाहनचालकांना काहीही फायदा होत नाही.

गोटीरामभय्या कांची चौकात उंच असा हायमस्ट उभारण्यात आलेला आहे. त्याच चौकाला लागून मंडई येथे मेट्रोचे काम सुरू असल्याने हायमास्ट दिवा बंद आहे. त्या चौकातून त्यापुढील टोबॅको कॉर्नरवर असलेला हायमास्ट दिवाही बंद आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असून, त्यामुळे अपघातांची शक्यता आहे. श्री लाकडी गणपती सार्वजनिक गणपती मंडळासमोर असलेले दोन पथदिवे बंद आहेत. त्यामुळे या परिसरात अंधार पसरला आहे.

दुकानांतील प्रकाश रस्त्यावर

रस्त्यावर काही ठिकाणी पथदिवे असून, ते बंद आहेत, तर काही ठिकाणी पथदिवेच नाहीत. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असून, दुकानांबाहेर लावलेल्या दिव्यांचा प्रकाश रस्त्यावर पडत आहे. मात्र, ही दुकाने बंद झाल्यानंतर रस्त्यावर अंधाराचे साम—ाज्य निर्माण होत आहे.

पथदिव्यांबाबत तुमचे अनुभव कळवा

पुणेकरांनो, पथदिव्यांच्या दिव्य स्थितीचे आणि सोसाव्या लागणार्‍या गैरसोयींचा आँखो देखा हाल 'टीम पुढारी'ने तुमच्यासमोर मांडला आहे. पुण्यात रात्री प्रवास करताना तुम्हाला काय त्रास सहन करावा लागतो? ते थोडक्यात 'पुढारी'ला 9823158113 या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपने कळवा आणि फोटोही पाठवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news