पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी | पुढारी

पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, आवश्यक ती तयारी केली जात आहे. त्यामुळे मतदार याद्यांपासून मतदान केंद्र, मतदान यंत्रांचे नियोजन करण्यात येत आहे.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये होणार आहेत. परंतु, दिवंगत खासदार बापट यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. या मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार किंवा नाही, हे स्पष्ट नाही. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. शिवाजीनगर, कोथरूड, कसबा, कॅन्टोन्मेंट, पर्वती आणि वडगाव शेरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून पुणे लोकसभा मतदारसंघ आहे. मतदारसंघात एकूण 19 लाख 72 हजार मतदार असून, दोन हजार मतदान केंद्रे आहेत.

मोठा मतदारसंघ असल्याने मतदानासाठी लागणारी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्ही पॅट अशी 12 हजार 600 यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे आहेत. या यंत्रांची प्राथमिक तपासणी सुरू केली आहे. चार हजार 200 बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्ही पॅट मशिन्स आहेत.

त्यांची तपासणी करून नव्याने वापरण्यायोग्य यंत्रे, अतिरिक्त आणि पर्यायी यंत्रांची उपलब्धता, त्यांची सुरक्षाव्यवस्था आदी तयारी कोरेगाव पार्कमधील खाद्य गोदामामध्ये करण्यात येत आहे. पुढील दोन दिवसांत ही तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या देखरेखीखाली ही तपासणी सुरू असून तलाठी, मंडलाधिकारी, महसूल विभागातील लिपिक हे तपासणीचे काम करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Back to top button