पुणे : मुक्त विद्यापीठाची डिग्री ऑनलाइन देणार !

पुणे : मुक्त विद्यापीठाची डिग्री ऑनलाइन देणार !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी पुढील काळात आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय बदल केले जातील. तसेच मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन डिग्री विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी मुक्त विद्यापीठाच्या केंद्रांचे सक्षमीकरण आणि कामात सुसूत्रता आणण्यासाठी काम करणार असल्याचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांची नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. यानिमित्त विद्यापीठातर्फे मंगळवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता डॉ. सोनवणे यांचा सेवागौरव समारंभ आयोजित केला आहे. त्यानंतर सोनवणे दुपारी मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी जाणार आहेत. डॉ. सोनवणे म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने जाहीर केल्यानुसार विद्यार्थ्यांना तीन प्रकारे पदवी घेता येणार आहे.

या तिन्ही प्रकारांतील पदव्यांना समकक्षता देण्यात आली आहे. यामध्ये पहिली पारंपरिक आणि दुसरी दूरस्थ प्रकारे पदवी घेता येते आणि तिसरा प्रकार म्हणजे ऑनलाइन पदवी यामध्ये विद्यार्थी प्रवेश ऑनलाइनच घेणार, अध्यापन ऑनलाइन घेणार आणि पदवी देखील ऑनलाइनच देण्यात येणार आहे. यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात येणार असून, सॉफ्टवेअरचे अनावरण होताच डिग्रीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार

शिक्षणाची आवड असणार्‍या; पण काही कारणास्तव प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेऊ न शकणार्‍या विद्यार्थ्यांसह आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना या माध्यमातून दर्जेदार शिक्षण उपलब्ध होणार आहे. मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून काही जिल्ह्यांत नाही, तर राज्यभर काम करण्याची संधी आहे. त्यामुळे पुढील काळात राज्यातील विद्यार्थ्यांसाठी काम करणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news