भिगवण : उजनीची जलसफर अविस्मरणीय, भुरळ पाडणारी

भिगवण : उजनीची जलसफर अविस्मरणीय, भुरळ पाडणारी

भरत मल्लाव

भिगवण : सिमेंटच्या जंगलात राहून कंटाळला असाल व अनेक परिचयाची पर्यटन चाखून झालेल्या पर्यटकांना विरंगुळा घालवण्यासाठी उजनी एक वेगळा व नवा पर्याय उभा राहिला आहे. येथील नौका विहार, जलसमाधी मिळालेल्या वास्तू, ग्रामीण परंपरा, जगभरातील रंगीबेरंगी पक्ष्यांच्या नयनरम्य कवायती, चित्रबलाक पक्ष्यांचे सारंगगार आणि सोबतीला अस्सल चविष्ट माश्यांची मेजवानी यामुळे रंगीबेरंगी आकाशयात्रींच्या सानिध्यातील उजनीची जलसफर अविस्मरणीय व भुरळ पाडणारी ठरतेय.

महाराष्ट्रात स्थलांतरित पक्ष्यांचे माहेरघर म्हणून उजनीची ओळख बनली आहे. डिसेंबर महिनाअखेरीस राज्य, देश तसेच परदेशातून विविध जातींचे पक्षी उजनीकडे झेपावतात आणि मग मे अखेर उजनीचा काठ अगदी बहरून जातो. सर्वत्र पाणथळ जागेत हजारो पक्ष्यांच्या किलबिलाटाने उजनीचे सौंदर्य खुलून जाते. पर्यटनाचा प्रवास लाकडी नौकेतून होतो. वल्ह्याच्या साहाय्याने वल्हवली जाणारी होडी व खळखणारे पाणी मंत्रमुग्ध करते. जसजशी होडी पाण्याचे अंतर कापत जाते तसतसा विस्तीर्ण जलाशयात बोटिंगची मजा घेता येते. अलीकडे मात्र वेळेची बचतीसाठी या होड्यांना इंजिन जोडत आधुनिकतेचा साज चढवण्यात आला आहे.

पुढे गेले की, पाणवठ्यावर पक्ष्यांचे थवेच्या थवे पाहताना डोळ्यांना सुखद अनुभव येतो. पाण्यातील मासे चोचीने पकडण्याची तत्परता, शिकारीची चपळता, नवजात पक्ष्यांच्या पिलांना भरवले जाणारे घास असे चित्र इथे पाहताना अंगावर वेगळाच रोमांच उभा करतो; तर काही पक्षी प्लवंगाच्या शोधात कित्येक वेळ पाण्यात तोंड खुपसून दीर्घकाळ श्वास रोखणारी क्रिया अचंबित करणारी ठरते. त्यांच्यात चालणारी भांडणे, हुल्लडबाजी, प्रणय पाहणे तर अद्भुत नजारा ठरतो.

उजनीकाठी शेकडो जातींच्या पक्ष्यांची रेलचेल आहे. यामध्ये पट्टकदंब, चक्राकार, राखी बगळे, ब्राह्मणी बदक, घार, चमचा, तुतारी, पाणकोंबडी, धोबी, शराटी, सुरय, खंड्या, हळदी कुंकू, वादळी टीवळा, रात बगळा, तापस, कुदळ्या, चक्रांग, कापशी, गरुड आदी 450 हून अधिक जातींच्या पक्ष्यांची मांदियाळी येथे दिसते. आफ्रिका, पाकिस्तान, सैबेरिया, हिमालय, गुजरात आदी देश-विदेशांतील पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करत येथे येतात.

मध्येच भोरड्या पक्ष्यांचे आकाशातील विविध आकाराच्या कवयातीचा नजराणा तर अकल्पानिय व अदभुत ठरतो. भारतातून नामशेष होऊ पाहणार्‍या व रेड डाटा पुस्तकात नोंद असलेल्या चित्रबलाक पक्ष्यांचे भारतातील सर्वांत मोठे सारंगगार ब्रिटिशकालीन भादलवाडी तलावात आढळून येते. विशेष म्हणजे हे सारंगगार हे दै.'पुढारी'मुळे उजेडात आले. विणीच्या हंगामात पक्ष्यांच्या वसाहतीत शेकडो नवजात चित्रबलाक आकाशात झेपवण्यासाठी सज्ज होतात. नर, मादीची आपल्या पिलांना जगवण्याची चाललेली धडपड काळजाचा थरकाप उडवल्याशिवाय राहात नाही. असा पक्ष्यांच्या सानिध्यातील दिवस नक्कीच आल्हादायक व अविस्मरणीय ठरतो.

पर्यटनस्थळी कसे पोहोचाल

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुणेकडून 100 किलोमीटर तर सोलापूरकडून 120 किलोमीटर आणि अहमदनगरकडून 110 किलोमीटर भिगवण येथे यावे. तेथून कुंभारगाव, भादलवाडी, डाळज, पळसदेव, डिकसळ, कोंढार चिंचोली भागात सहज जाता येते. या सर्व भागात नौकांची खास सोय उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news