पुणे : भीमा नदीत बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह अखेर मिळाले | पुढारी

पुणे : भीमा नदीत बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह अखेर मिळाले

कोरेगाव भीमा; पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भीमा नदीत रविवारी (दि. २१) दुपारी दीडच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाली होती. गौरव गुरुलिंग स्वामी (वय १६) आणि अनुराग विजय मांदळे (वय १६) अशी त्यांची नावे असून ही मुले कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ढेरंगे वस्ती येथे वास्तव्यास होती. अखेर त्यांचे मृतदेह हाती लागले आहे.

रविवारी दुपारी पाच ते सात मुले भीमा नदीत पोहण्यास गेली होती. गौरव स्वामी हा शिकावू असल्याने खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचे संतुलन बिघडून बुडू लागल्याचे पाहत अनुराग मांदळे त्याच्या मदतीस गेला; मात्र गौरव घाबरल्याने त्याने अनुरागला आवळून धरले. यामुळे दोघेही पाण्यात बुडले.

या वेळी बाकीच्या मुलांनी आरडाओरडा केला असता शेजारील शेतकरी तानाजी ढेरंगे धावून आले सोबत स्वप्नील भोकरे, संपत भांडवलकर, बापू भांडवलकर, भाऊ अजगर, आदी ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात उतरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाही. तानाजी ढेरंगे यांनी त्वरित शिक्रपुरचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश थोरात यांना कळविले.

घटनेची माहीती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलिस हवालदार मंगेश लांडगे,पोलिस शिपाई अमोल रासकर आदी पोहचले. दरम्यान पुणे महाविकास प्राधिकरण अग्निशमन दलाचे जवान तसेच रुग्णवाहिका दाखल झाल्या. दुपारी चारपासून अग्निशमन दलाचे जवान पाण्यात उतरले व शोधकार्य सुरू केले रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त केली जात होती.

सोमवारी (दि. २२) सकाळी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नादरम्यान साडे दहाच्या सुमारास एक किमी अंतरावर नदी किनारी खडकाच्या शेजारी गौरव स्वामी याचे मृतदेह सापडला, तर अनुराग मांदळे याचा मृतदेह शोधण्यासाठी दुपारपर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले असता शेवटी दुपारी २ च्या सुमारास अनुराग मांदळे यांचा मृतदेह पोहण्याच्या ठिकाणीच सापडला.

Back to top button