ओतूर : पोलीस असल्याची बतावणी करून पाच तोळे सोने लांबवले | पुढारी

ओतूर : पोलीस असल्याची बतावणी करून पाच तोळे सोने लांबवले

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : तुम्हाला केव्हांचे हाक मारत आहोत असे दरडावून सांगत, आम्ही पोलीस आहोत, एव्हढे सोने अंगावर घालून कशाला फिरता? सर्व सोने काढून खिशात ठेवा, अशी बतावणी दोघा भामट्यानी वृद्धास करून ३ सोन्याच्या अंगठ्या व १ सोनसाखळी असे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने रुमालात ठेवण्याचे नाटक करताना हात चलाखीने लांबवून दुचाकीवरून पोबारा केला. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी ८.४५ वाजेदरम्यान ओतूर येथील जुन्या बसस्थानक परिसरातील राधाकृष्ण किराणा दुकानासमोर केवळ २० फुटांचे अंतरात घडली.

बबन विठ्ठल नलावडे (वय ६०, रा. धोलवड भवानीनगर, ता. जुन्नर) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून या घटनेत आजच्या बाजारभावाप्रमाणे सुमारे ३ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरीस गेल्याचे खात्रीशीर माहिती समजली आहे. याबाबत नलावडे हे ओतूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले आहेत. दरम्यान अलीकडच्या काळात जुन्नर तालुक्यात या प्रकारच्या फसवणुकीच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. ही बाब चिंताजनक असून विशेषतः वयोवृद्ध नागरिकांनी विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

आणखी एकाला गंडविले

बबन नलावडे यांचे दागिने लांबवले नेमके त्याच वेळी शेजारून चाललेल्या दुसऱ्या इसमाला देखील या भामट्यानी अडवले व नलावडे यांचे समक्ष त्या इसमास अंगावरील दागिने रुमालात काढून ठेवण्यास सांगितले; मात्र तो दुसरा इसम कोण? कुठला? याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही, असे बबन नलावडे यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

Back to top button