सिंहगड घाट रस्त्यावर मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी | पुढारी

सिंहगड घाट रस्त्यावर मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

खडकवासला(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रविवारी सकाळपासून पर्यटकांनी गजबजून गेला होता. घाट रस्त्यावर गोळेवाडी टोल नाक्याजवळ मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार पर्यटक गंभीर झाला. खडकवासला धरण चौपाटीवरील पुणे-पानशेत रस्त्यावर पोलिसांनी काटेकोर नियोजन केल्यामुळे सुटीच्या दिवशी होणार्‍या वाहतूक कोंडीतून पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला. सिंहगड वनविभागाचे वनरक्षक बाळासाहेब जिवडे, संदीप कोळी, नितीन गोळे व सुरक्षा रक्षकांनी जखमी पर्यटकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवले.

दिवसभरात गडावर पर्यटकांची चारचाकी 353 व दुचाकी 556 वाहने आल्याची नोंद झाली. दुपारी बाराच्या सुमारास गडावरील वाहनतळ हाऊसफुल्ल झाल्यामुळे थेट घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षारक्षकांना कोंढापूर फाट्यापासून वाहनतळापर्यंत धावपळ करावी लागली. गेल्या रविवारच्या तुलनेत आज पर्यटकांची संख्या अधिक होती. सायंकाळी पुण्याकडे जाणार्‍या वाहनांची संख्या वाढल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले.

धरण परिसरात सुरक्षारक्षकांचा पहारा

खडकवासला धरणात पर्यटक उतरू नये, परिसरात सुरक्षा रक्षक पहारा देत होते. तर, चौपाटीवरही पोलिस तैनात होते. त्यामुळे धरणात उतरणार्‍या पर्यटकांना पायबंद बसला. पानशेत रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी हवेली पोलिस ठाण्याच्या तीन अधिकार्‍यांसह वीस पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. खडकवासला धरण चौकापासून ठिकठिकाणी पोलिस उभे होते.

Back to top button