Pune Accident : पुण्यातील उंड्री चौकात विचित्र अपघात; भरधाव गाडीची ५-६ गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू | पुढारी

Pune Accident : पुण्यातील उंड्री चौकात विचित्र अपघात; भरधाव गाडीची ५-६ गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भरधाव खासगी बसचे ब्रेक निकामी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात २१ मे ला रात्रीच्या सुमारास कोंढव्यातील एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावरील ऑर्चिड पॅलेससमोर घडला. या बसचा वेग इतका होता, की अन्य सहा वाहनांचेही मोठे नुकसान झाले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस (एमएच-12-एचबी-0242) उतारावरून भरधाव येत होती. त्या वेळी तिचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस अन्य वाहनांवर धडकली. घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघातात रिक्षा, कार, दुचाकी या वाहनांचे नुकसान झाले.

या अपघातात रिक्षाचालक मधू कुवर आणि प्रवासी अलिस्टर मर्चंट, राजेश जेडीपाल जखमी झाले आहेत. बसचा चालक मैनुद्दिन मेहबूब शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघात झाल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरुळीत केली.

Back to top button