प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करावे : आ. रोहित पवार | पुढारी

प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करावे : आ. रोहित पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भाजपला फायदा होऊ नये यासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने मागच्या निवडणुकांमध्ये प्रचंड मते खाल्ली. त्यामुळे भाजपचे 7 खासदार आणि 22 आमदार निवडून आले. आम्हालाही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, तसेच प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते पुण्यात आले होते.

त्या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ’भाजपच्या विरोधात लोकांचा रोष आहे, नाहीतर जनता आपल्यालाही सोडणार नाही. महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. मनभेदही नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन लढले पाहिजे. महाविकास आघाडी त्याच भूमिकेने काम करत आहे.’ अजित पवार यांच्या विधानवर ते म्हणाले, ’अजित पवार आकड्यांवर बोलतात.

आजच्या घडीला राष्ट्रवादीकडे जास्त आमदार आहेत. शरद पवार मोठे मार्गदर्शक आहेत. त्यांचा अनुभव पाहता, अनुभवाने राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे. त्याचा अर्थ असा नाही की, आम्ही जास्त जागा मागणार किंवा कमी मागणार. मात्र राष्ट्रवादी मोठा भाऊ आहे असं म्हणणं योग्य आहे.’ ’राज्यात 50 टक्के कमिशनचा रेट सुरू आहे. पैसा कोणापर्यंत जातो माहिती नाही. मात्र राजकारणासाठी आणि लोकांना फोडण्यासाठी हे पैसे वापरले जातात. पैसे खिशातून जात नाहीत. कुठून येतात याचा अंदाज आता सामान्य लोकांना आला आहे,’ असेही ते म्हणाले.

Back to top button