आरटीई प्रवेशासाठी आज शेवटची संधी | पुढारी

आरटीई प्रवेशासाठी आज शेवटची संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशप्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी आज (दि. 22) शेवटची संधी असून, मंगळवारपासून (दि. 23) प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. दरम्यान, तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रवेशाची गती संथच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे 62 हजार 456 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, अद्यापही प्रवेशाच्या 39 हजार 390 जागा रिक्त आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालया तर्फे आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यंदा राज्यातील 8 हजार 823 शाळांतील 1 लाख 1 हजार 846 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण 3 लाख 64 हजार 413 अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून 94 हजार 700 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. आत्तापर्यंत 62 हजार 456 विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केल्याचे आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसते. त्यामुळे अद्यापही 39 हजार 390 जागा रिक्तच असल्याचे दिसून येत आहे. आरटीई प्रवेशप्रक्रियेत प्रवेश निश्चित करण्यासाठी आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, प्रवेशाची गती संथच असल्याचे वारंवार दिसून आले आहे.

पालकांना सोयीची शाळा मिळत नसल्याने प्रवेश निश्चित केले जात नाहीत. त्यामुळे जागा रिक्त आहेत. निवडयादीतील विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठीच्या सूचना मिळण्याची प्रतीक्षा आहे. प्रतीक्षा यादीसाठी 81 हजार 129 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झालेला आहे. त्यामुळे नियमित विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन उर्वरित रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणार आहे.

Back to top button