पुणे : आयपीएल मॅचवर बेटिंग घेणारे रॅकेट उद्ध्वस्त | पुढारी

पुणे : आयपीएल मॅचवर बेटिंग घेणारे रॅकेट उद्ध्वस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुध्द चेन्नई सुपर किंग्सच्या सामन्यावर बेटिंग घेणार्‍यांचे रॅकेट गुन्हे शाखेने छापा टाकून उद्ध्वस्त केले. कोंढवा परिसरात धर्मश्री सिग्नेचर सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बेटिंगवर खंडणीविरोधी पथक 2 ने कारवाई करीत बड्या बुकीसह तिघांना बेड्या ठोकल्या.

बेटिंग प्रकरणात कोरेगाव पार्कमधील एका प्रसिध्द हॉटेल (पबच्या) मालकाचा देखील सहभाग असल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. त्याबरोबरच या सट्ट्याचे दुबई कनेक्शनही तपासले जात आहे. याप्रकरणी वसीम हनीफ शेख (रा. धर्मश्री सिग्नेचर सोसायटी, साईबाबानगर, कोंढवा खुर्द), इक्रामा मकसूद मुल्ला (26, रा. घोरपडी पेठ) आणि मुसाबिन मेहमूद बाशाइब (35, रा. सोमवार पेठ) यांना पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

तर कोरेगाव पार्क परिसरातील एका प्रसिध्द हॉटलचा (पबचा) मालक जितेश मेहता (रा. पुणे) आणि बुकी अक्षय तिवारी (रा. इंदौर, मध्य प्रदेश) यांच्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत खंडणीविरोधी पथक 1 मधील पोलिस नाईक शंकर संपते यांनी फिर्याद दिली आहे.

गुन्हे शाखेतील पोलिस अंमलदार सुधीर इंगळे आणि शंकर संपते यांना काही बुकी हे कोंढव्यातील एका सोसायटीमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा घेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धर्मश्री सिग्नेचर सोसायटीतील बंद फ्लॅटवर छापा टाकला.

अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथक 1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार प्रदीप शितोळे, विनोद साळुंखे, सदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, चेतन शिरोळकर, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे यांच्या पथकाने कारवाई केली.

Back to top button