शिवनेरी जिल्ह्याचा घाट; डोळा मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघावर | पुढारी

शिवनेरी जिल्ह्याचा घाट; डोळा मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघावर

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आगामी निवडणुकीच्या पार्श्भूमीवर भाजपकडून तयारी करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच पिंपरी-चिंचवडच्या दौर्‍यावर होते. या दरम्यान भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुणे जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मुद्दा उचलला. त्यामुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार लांडगे यांनी स्वतंत्र शिवनेरी जिल्ह्याची मागणी केल्याने भाजपचा आता शिरूर लोकसभा मतदारसंघावर डोळा असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पुणे जिल्ह्याचा विस्तार हा पुणे, पिंपरी-चिंचवडसह 13 तालुक्यांत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने पुणे जिल्हा हा राज्यातील सर्वांत मोठा जिल्हा आहे. ज्यावेळी ठाणे जिल्ह्याचा विस्तार झाला, त्यावेळी पुणे जिल्ह्याचा विस्तार व्हावा, अशी मागणी झाली होती; मात्र त्यावेळी पुरंदर आणि भोर तालुक्यांने याला विरोध दर्शवला होता. शिवनेरी जिल्हा झाला तर पिंपरी-चिंचवड हे प्रशासकीय केंद्र होईल. यातून मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव, शिरूर हे पाच तालुके यात समाविष्ट होतील. ही भौगोलिक रचना तयार झाली, तर पिंपरी-चिंचवडमध्ये असणार्‍या प्राधिकरणाच्या जागेवर स्वतंत्र न्यायालय, सीओईपीचा युनिव्हर्सिटी मंजूर आहे. त्यामुळे बारामतीप्रमाणे शिवनेरी जिल्ह्याची प्रशासकीय तयारी झालेली दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वी बारामती जिल्हा करण्यासाठी भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, कर्जत, माळशिरस आणि फलटण याचा समावेश करून बारामती जिल्ह्याची मागणी होती. यासाठी बारामती येथे सर्व प्रशासकीय सुविधा तयार करण्यातदेखील आल्या आहेत. मात्र, काही तालुक्यांचा याला विरोध असल्याने हे काम प्रस्तावित आहे. त्यामुळे महेश लांडगे यांनी शिवनेरी जिल्हा करण्याची मागणी केली असली, तरी त्याला प्रशासकीयदृष्ट्या अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण भाजपकडून अशी मागणी करण्यात येत असल्याचे कारण शिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष असून, आमदार लांडगे हे येथून उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचेदेखील बोलले जात आहे.

बारामती जिल्ह्याचा प्रश्नही भिजत घोंगडेच

बारामती जिल्हा करण्याच्या गोष्टीचेदेखील अनेक वर्षांपासून भिजत घोंगडे आहे. त्यामुळे आमदार लांडगे यांनी विभाजन करण्याची केलेली मागणी ही कितपत यशस्वी होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button